लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या संघटनेने कोंढव्यातील ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले देशविरोधी कृत्यासाठी वापरल्याचा ठपका राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ठेवला आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने गेलेल्या तपासणीत ही शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले असून, आता या शाळेवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पीएफआयने ब्ल्यू बेल्स शाळेच्या दोन मजल्यांचा वापर देशविरोधी कृत्यांसाठी केल्याचा ठपका एनआयएने दोषारोपपत्रात ठेवला. त्यानंतर शिक्षण विभागाने या शाळेची शिक्षण विभाग आणि महापालिकेतील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली. या चौकशीत शाळेचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही शाळा अनधिकृतरीत्या चालवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा- पुणे: अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ७०० हेक्टरवरील पिके भुईसपाट
विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे म्हणाले, की संबंधित शाळा स्वयंअर्थसहायित आहे. या शाळेच्या कागदपत्रांची तपासणी केली असताना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. तर शासनाकडून देण्यात आलेल्या मान्यता प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी आणि पुणे महापालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकाऱ्यांकडून सखोल तपासणी करण्यात येत आहे. या पडताळणीचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. शाळेवर गुन्हा दाखल करण्यात येईल.