लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या संघटनेने कोंढव्यातील ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले देशविरोधी कृत्यासाठी वापरल्याचा ठपका राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ठेवल्यानंतर शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत ही शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. आता ही शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन अन्य शाळेत केले जाणार आहे. तसेच शाळेवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पीएफआयने ब्ल्यू बेल्स शाळेच्या दोन मजल्यांचा वापर देशविरोधी कृत्यांसाठी केल्याचा ठपका एनआयएने दोषारोपपत्रात ठेवला. तसेच शाळेचे दोन मजले बंद करण्यात आल्याचे एनआयएने स्पष्ट केले. त्यानंतर शिक्षण विभागाने या शाळेच्या कागदपत्रांची शिक्षण विभाग आणि महापालिकेतील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. या चौकशीत शाळेचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही शाळा अनधिकृतरीत्या चालवली जात असल्याचे स्पष्ट झाले. स्वयंअर्थसहायित असलेली ही शाळा २०१९पासून चालवली जात आहे.
हेही वाचा… शरद पवारांची अदाणींनी भेट घेतली, पत्रकाराच्या प्रश्नावर अजित पवारांनी रोखलं; म्हणाले, “एक मिनिट…”
विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे म्हणाले, की या शाळेच्या कागदपत्रांची तपासणीत पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. आता ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन अन्य शाळेत केले जाईल. तसेच शाळेवर गुन्हा दाखल करण्यात येईल.