पिंपरी- चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी स्पार्कल कॅण्डलच्या कारखान्यात आग लागून सहा महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ओळखणे देखील त्यांच्या नातेवाईकांना अशक्य झालं होतं. ‘त्या’ सहा महिलांचा ‘डीएनए’ करून मृतांची ओळख पटवण्यात येणार असल्याने मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत आहेत. या घटनेमध्ये आतापर्यंत नऊ जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. सात जणांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे.
आणखी वाचा-पुणे : रिकाम्या खुर्च्या पाहून स्मृती इराणी यांनी अर्ध्यात सोडला कार्यक्रम
शुक्रवारी तळवडे या ठिकाणी स्पार्कल कॅण्डल बनवणाऱ्या अनधिकृत कारखान्यात भीषण आग लागून यात जागीच होरपळून सहा महिलांचा दुर्दैवी अंत झाला. अक्षरशः या महिलांचा कोळसा झाला होता. त्यांच्या नातेवाईकांना ओळखणे देखील कठीण होते. या सहा मृतदेहांचा डीएनए करून नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देणार आहोत असं पोलिसांनी सांगितले आहे. अद्याप ही सहा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असून आणखी काही अवधी लागण्याची शक्यता आहे. याबाबत पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे म्हणाले, आम्ही सहा मृतदेहाचा डीएनए पाठवला असून तो आज संध्याकाळी पर्यंत येण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी महिलांचे मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहोत. तोपर्यंत मृत महिलांचा नातेवाईकांना वाट पहावी लागणार आहे. या गंभीर घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा जीव गेला असून सात जण गंभीर जखमी आहेत.