लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : खराडीतील नदीपात्रात गेल्या आठवड्यात एका महिलेचे शीर धडावेगळे करुन तिचा मृतदेह वाहत्या पाण्यात टाकल्याप्रकरणाचे गूढ पोलिसांनी उलगडले. याप्रकरणी मजूर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. घराच्या मालकीहक्कावरून झालेल्या भांडणातून सख्याभावाने पत्नीच्या मदतीने बहिणीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सकीना अब्दुल खान (वय ४८, रा. भय्यावाडी, शिवाजीनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ अश्फाक अब्दुल खान ( वय ५१) आणि त्याची पत्नी हमीदा (वय ४५, दोघे रा. भय्यावाडी ) यांना अटक करण्यात आली.

राहत्या घराच्या मालकी हक्कावरून झालेल्या भांडणातून अश्फाक आणि हमिदा यांनी सकीनाचा दोरीने गळा आवळून खून केला, अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. सकिना यांचे शीर आणि अवयव अद्याप हाती लागलेले नाहीत. नदीपात्रात सापडलेले धड साकीनाचेच असल्याबाबत डीएनए चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

आणखी वाचा-मुरलीधर मोहोळांचे पक्षातील वजन वाढले, विधानसभेसाठी दिली मोठी जबाबदारी

खराडीतील नदीपात्रामध्ये गुरुवारी (२९ ऑगस्ट) एका महिलेचे धड सापडल्याने खळबळ उडाली होती. महिलेचे धड, दोन हात व दोन पाय अद्याप सापडलेले नाहीत. शीर सापडले नसल्याने महिलेची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या तसेच स्थानिक कोळ्यांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. नदीपात्रात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पाहणी करण्यात आली. महिलेबाबत माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चंदननगर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या दहा पथकांकडून तपास करण्यात येत होता.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच, ग्रामीण भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली. शुक्रवारी (३० ऑगस्ट) सकीनाच्या भाचीने ती बेपत्ता असल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस तपासाला गती आली. सकीना पाटील इस्टेट झोपडपट्टीतील घरात भाऊ आणि वहिनीसोबत वास्तव्याला होती. संशयावरुन पोलिसांनी तिचा भाऊ अश्फाक याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सकीना गावी गेल्याची बतावणी केली. अश्फाकला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने बहीण सकीनाचा खून केल्याची कबुली दिली.

आणखी वाचा-मुंडेंकडे जबाबदारी अन् मुळीकांच्या आशा पल्लवीत! वडगावशेरीमध्ये महायुतीत चुरस

सकीना अविवाहित होत्या. छोटीमोठी कामे करून उदरनिर्वाह करायची. अश्फाक आणि हमीदा दोघे मजुरीकाम करतात. त्यांची दोन मुले बाहेरगावी शिक्षण घेतात. राहते घर सकीनाच्या आई वडिलांनी तिच्या नावावर केले होते. सकिनाने घर नावावर करून द्यावे, यासाठी अश्फाक आणि त्याची पत्नी तिच्याशी भांडण करायचे. घर नावावर करुन तिने निघून जावे, यासाठी ते त्रास देत होते. गेल्या आठवड्यात या कारणावरून झालेल्या भांडणानंतर अश्फाक आणि हमीदाने दोरीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांनी रविवारी (२५ ऑगस्ट) खराडीमधील नदीपात्रात फेकून दिले, अशी माहिती तपासात मिळाली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, चंदननगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, अनिल माने, गुन्हे शाखा युनीटचे चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि पथकाने याप्रकरणाचा तपास केला.

आणखी वाचा-गणेशोत्सवात सडक सख्याहरींना चाप, सडक सख्याहरींची छायाचित्रे चौकात लावणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

क्रौर्याचा कळस

सकीना यांचा खून २३ ऑगस्ट रोजी करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या मृतदेहाचे तुकडे आरोपींनी नदीपात्रात फेकले. दोन दिवस त्यांनी मृतदेह कोठे ठेवला होता ? तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी तीक्ष्ण शस्त्रे कोठून आणली ? शिवाजीनगरहून मृतदेहाचे तुकडे खराडीपर्यंत कसे नेले? या गुन्ह्यात अन्य कोणी आरोपी सामील आहेत आहेत ? यादृष्टीने तपास सुरू आहे. आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, तपासात याबाबतची माहिती मिळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.