पुणे : वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा उपचार केंद्र चालविणाऱ्या तोतया डाॅक्टरला अटक करण्यात आली. याप्रकरणी तोतया डाॅक्टरविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बिभुती विमल बागची (वय ४३, रा. गोकुळनगर, वारजे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुणा तरडे (वय ४५) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बागचीविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागचीने वारजे भागातील आनंद हाॅस्पिटल परिसरात मूळव्याध उपचार केंद्र सुरु केले होते. वैद्यकीय पदवी, तसेच व्यवसायास परवानगी नसताना त्याने बेकायदा उपचार केंद्र सुरु केले होते. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. बागचीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. पोलीस हवालदार भिंगारदिवे तपास करत आहेत.

हे ही वाचा…पिंपरी : राज्याच्या तिजोरीत खडखडाट? अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, ‘राज्याची आर्थिक’…

लोणी काळभोर भागात वैद्यकीय पदवी नसताना जनसेवा क्लिनिक नावाचा दवाखाना थाटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रकाश रंगनाथ तोरणे याला जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. तोरणे एका रुग्णालयात कपांऊंडर म्हणून काम करत होता. वैद्यकीय पदवीन नसताना गेले पाच वर्ष तो रुग्णांवर उपचार करत असल्याचे तपासात उघडकीस आले होते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरेगाव येथे बनावट नाव आणि वैद्यकीय पदवीचा वापर करून रुग्णांवर उपचार करणारा तोतया डाॅक्टर मेहमूद फारुख शेख याला अटक करण्यात आली होती. होती. शेख महेश पाटील या बनावट नावाने रुग्णालय चालवत होता. शेखचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. दहावीनंतर नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात तो कंपाउंडर म्हणून काम करीत होता. मुंढवा केशवनगर भागातील पी. रामकृष्ण रेड्डीची (वय ६६) याला अटक करण्यात आली होती. तो शस्त्रक्रिया विभागात मदतनीस होता. निवृत्तीनंतर त्याने उत्तर प्रदेश येथून एका संघटनेकडून प्रमाणपत्र घेऊन मुंढवा भागात दवाखाना थाटल्याचे उघडकीस आले होते.