जनसेवा क्लिनिक या नावाने लोणी काळभोर भागात पाचेक वर्षांपूर्वी एक दवाखाना थाटला गेला. तेथील तोरणे डॉक्टरांचा हातगुण चांगला असल्याची प्रसिद्धी झाली आणि दवाखान्याबाहेर रांगा लागू लागल्या. गेली पाच वर्षे या दवाखान्यात रुग्ण येत होते आणि त्यांच्यावर उपचारदेखील केले जात होते. गेल्या चार जुलैला मात्र वेगळे घडले. त्या दिवशी डॉ. रूपाली रघुनाथराव भंगाळे (वय ३८, रा. काळेपडळ, हडपसर) या लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करत होत्या, तेव्हा हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी डाॅ. भंगाळे यांच्याशी संपर्क साधला. लोणी काळभोरमधील जनसेवा क्लिनिक चालविणारा तोरणे हा डाॅक्टर नसून, त्याच्याकडे वैद्यकीय पदवीही नसल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विस्तार अधिकारी डॉ. महेश वाघमारे, डॉ. रूपाली भंगाळे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मनोज उबरे लोणी काळभोर पोलिसांना घेऊन तोरणेकडे गेले. त्याच्याकडे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिसीनच्या प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. त्या वेळी तोरणेने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक तपासणी करण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे वैद्यकीय पदवी नसल्याची माहिती उघडकीस आली. अखेर रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या तोतया डाॅक्टरवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि प्रकाश रंगनाथ तोरणे याला अटक करण्यात आली.
हेही वाचा: मोहरमनिमित्त पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत आज बदल
तोरणेकडून वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य, औषध-गोळ्या जप्त केल्या गेल्या. त्यानंतर त्याचा दवाखानाही लाखबंद करण्यात आला. लोणी काळभोर भागात दहावी उत्तीर्ण कंपाउंडर पाच वर्षे दवाखाना थाटून रुग्णांवर उपचार करतो आणि त्याचा यंत्रणांना इतकी वर्षे सुगावाही लागत नाही, हे समोर येणे सुन्न करणारे आहे. आतापर्यंत त्याने हजारो रुग्णांवर उपचार केले असतील. वैद्यकीय पदवी नसताना हे उद्योग राजरोसपणे चालू होते, हे भयानक आहे. तोरणे रुग्णांकडून तपासणीसाठी ७५ ते १०० रुपये घेत असल्याची माहिती आहे. हे शुल्क कमी असल्याने त्याचा गुण चांगला असल्याची चर्चा होत होती, की कसे, असाही प्रश्न आहे.
तोरणेच्या दवाखान्यासमोर रांगा लागायच्या, तसे दृश्य पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वस्तीभागात असलेल्या सर्व दवाखान्यांबाहेर अलीकडे पाहायला मिळते. पण, जे डाॅक्टर उपचार करतात, त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे की नाही, दवाखान्याच्या पाटीवर लिहिलेली पदवी अस्तिवात आहे की नाही, याची शहानिशा कोण करणार? रुग्णांकडून करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, ज्या यंत्रणांकडून अशा प्रकारची तपासणी केली जाते, त्या यंत्रणांनाही याबाबतची माहिती नसावी? वस्ती भागातील नागरिकांची परिस्थिती हलाखीची असते. त्यामुळे गरजूंवर कमी पैशांत किंवा मोफत उपचार करणारे असतील, तर त्यांच्याकडे गर्दी असते. काही डॉक्टर सच्चेपणाने समाजसेवा म्हणून हे काम करतातही. पण, ज्यांनी मुळात वैद्यकीय शिक्षणच घेतले नाही, ते उपचार करण्यास कसे धजावतात, हा प्रश्न आहे. त्यांच्याकडून एखाद्या रुग्णाला गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावे लागले, तर त्याची जबाबदारी कोणाची? तोतया डॉक्टरवरील कारवाईच्या निमित्ताने रुग्णांच्या जीवाशी चालणाऱ्या या खेळाची किमान माहिती तरी उजेडात आली. गरीब, असहाय रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी केवळ एवढी कारवाई करून भागणार नाही, तर स्वस्त दरात सार्वजनिक आरोग्य सेवा कशी उपलब्ध होऊ शकेल, याचाही विचार करावा लागणार आहे.
हेही वाचा: पुणे: तब्बल ५६ वार करून सामाजिक कार्यकर्त्याचा खून; १२ जणांना जन्मठेप
लूटमारीचा ‘धंदा’
मध्यंतरी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरेगाव येथे बनावट नाव आणि वैद्यकीय पदवीचा वापर करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका तोतया डाॅक्टरला पकडण्यात आले. मेहमूद फारुख शेख याला त्या वेळी अटक झाली होती. शेख महेश पाटील या बनावट नावाने रुग्णालय चालवत होता. शेखचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. दहावीनंतर नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात तो कंपाउंडर म्हणून काम करीत होता. अशीच गोष्ट वैद्यकीय पदवी नसताना दवाखाना थाटलेल्या मुंढवा केशवनगर भागातील पी. रामकृष्ण रेड्डीची (वय ६६). तो शस्त्रक्रिया विभागात मदतनीस होता. निवृत्तीनंतर त्याने उत्तर प्रदेश येथून एका संघटनेकडून प्रमाणपत्र घेऊन मुंढवा भागात दवाखाना थाटल्याचे उघडकीस आले होते.
rahul.khaladkar@expressindia.com