जनसेवा क्लिनिक या नावाने लोणी काळभोर भागात पाचेक वर्षांपूर्वी एक दवाखाना थाटला गेला. तेथील तोरणे डॉक्टरांचा हातगुण चांगला असल्याची प्रसिद्धी झाली आणि दवाखान्याबाहेर रांगा लागू लागल्या. गेली पाच वर्षे या दवाखान्यात रुग्ण येत होते आणि त्यांच्यावर उपचारदेखील केले जात होते. गेल्या चार जुलैला मात्र वेगळे घडले. त्या दिवशी डॉ. रूपाली रघुनाथराव भंगाळे (वय ३८, रा. काळेपडळ, हडपसर) या लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करत होत्या, तेव्हा हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी डाॅ. भंगाळे यांच्याशी संपर्क साधला. लोणी काळभोरमधील जनसेवा क्लिनिक चालविणारा तोरणे हा डाॅक्टर नसून, त्याच्याकडे वैद्यकीय पदवीही नसल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विस्तार अधिकारी डॉ. महेश वाघमारे, डॉ. रूपाली भंगाळे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मनोज उबरे लोणी काळभोर पोलिसांना घेऊन तोरणेकडे गेले. त्याच्याकडे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिसीनच्या प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. त्या वेळी तोरणेने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक तपासणी करण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे वैद्यकीय पदवी नसल्याची माहिती उघडकीस आली. अखेर रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या तोतया डाॅक्टरवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि प्रकाश रंगनाथ तोरणे याला अटक करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा