पैसे मिळवण्यासाठी साप पकडण्याचे उद्योग; वनविभागाचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष 

वाघापासून वाचण्यासाठी गाय एका घरात शिरते आणि ते घर नेमके कसायचे असते, अशी कथा आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचा प्रत्यय सध्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत येत आहे. सर्पमित्र म्हणजे केवळ पैसे कमावण्याचे साधन झाले असून काही रक्षकच भक्षक बनले आहेत, असे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सातत्याने समोर येत असून वनविभागाकडून याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सर्पमित्र संघटनांकडून होत आहे.

दरवर्षी नागपंचमीपासून शेवटच्या श्रावणी सोमवापर्यंत गारुडय़ांकडून अनेक नाग जप्त केले जातात. वाघोली, नसरापूर, येरवडा, यवत येथून, खास करून शिवमंदिरांतून ही कारवाई करण्यात येते. अनेक सर्पमित्र साप पकडण्यासाठी पैसे घेतात, तर अनेक जण साप पुन्हा गारुडय़ाला विकतात. एकाच गारुडय़ाकडून सुमारे सहासात वेळा नाग पकडण्यात आल्याचे प्रकार सातत्याने घडतात. ‘वाइल्ड अ‍ॅनिमल्स अ‍ॅण्ड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी’ (डब्ल्यूएएसपीएस) अशा सर्पमित्रांवर लक्ष ठेवून आहे. या संस्थेचे सुमारे १७० सर्पमित्र कोणताही मोबदला न घेता पुण्यात कार्यरत आहेत. लबाडी करणाऱ्या अनेक खोटय़ा सर्पमित्रांना संस्थेने आजवर पकडले आहे. संस्थेतर्फे अनेक ठिकाणी जाऊन सापांविषयी विनामूल्य जनजागृती करण्यात येते. पुणे जिल्ह्य़ात मानवी वस्तीत पकडण्यात येणाऱ्या सापांची संख्या वर्षांला सुमारे दोन हजार नऊशे आहे. पैसे घेऊन साप पकडणाऱ्या सर्पमित्रांच्या घरी धाडी टाकल्या, तर किमान आठ ते दहा साप तर नक्कीच सापडतील. आम्हाला कळवा आम्ही कारवाई करू, एवढेच उत्तर वनविभागाकडून मिळते, असे संस्थेचे अध्यक्ष संतोष थोरात यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. बोगस सर्पमित्रांना प्रतिबंध असावा म्हणून नियमावली तयार करून अंमलबजावणी करणे, सर्पमित्रांच्या अर्जाची छाननी करून योग्य त्यांनाच ओळखपत्र देणे, हे सर्व करूनही बोगस सर्पमित्र खुलेआम वावरत आहेत.

सर्पमित्रांना वनविभागाकडून दिला जाणारा परवाना वर्षभरासाठी असतो. गेल्या वर्षभरात वनविभागाकडे बोगस सर्पमित्रांबाबत काही माहिती, तक्रार न आल्याने कोणावरही कारवाई केलेली नाही.

महेश भावसार, सहायक वनसंरक्षक

Story img Loader