ऐंशीच्या दशकात प्राणी पाळणे हे प्रतिष्ठेचे झाल्यानंतर हळूहळू त्यातही तपशिलाला महत्त्व येऊ लागले. कुत्रे किंवा मांजर पाळले.. एवढय़ावर विषय संपला नाही तर ते कोणत्या प्रजातीचे, पुढे जाऊन कोणत्या वंशावळीतले असे तपशील प्रतिष्ठेचे ठरू लागले. यातून वाडय़ाच्या, घराच्या दाराशी येऊन बसणारा, मिळेले ते खाणारा, चाळीतील घरोघरी जाऊन पोट भरणारा स्थानिक रहिवासी ‘मोत्या’ उपेक्षित होऊ लागला. सोसायटय़ा, रस्ते, वाडे, चाळी, गल्ल्या, बोळ, आळी.. अशी सगळीकडे कुणालाच ‘आपली’ म्हणून हक्क सांगता येणार नाही अशी कुत्री, मांजरे पूर्वीपासूनच आहेत. मात्र बागडणारी ही प्रजा सामाजिक प्रश्न झाली नव्हती. आता मात्र ‘मोकाट’ प्राणी हा सामाजिक प्रश्न झाला आहे. कंटाळा आल्यामुळे पालकांनी रस्त्यावर सोडलेले परदेशी प्रजातींचे प्राणी, स्थानिक प्रजाती यांच्या सरमिसळीतून या प्रश्नाची जटिलताही गेल्या अनेक वर्षांत वाढत गेली आहे. ही झाली एक बाजू.. आता हे लोलक पुन्हा दुसऱ्या टोकाला पोहोचू लागले आहे. मोकाट प्राण्यांच्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यातून असेल, स्थानिक प्रजातींच्या आवडीतून असेल किंवा स्वयंसेवी संस्था प्राणी प्रेमींनी केलेल्या जागृतीतून असेल पण अनाथ किंवा मोकाट प्राण्याचे पालकत्व स्वीकारणे याला प्रतिष्ठा मिळू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दत्तक मेळाव्यांना प्रतिसाद

हजारो रुपये मुद्दाम विकत घेऊन प्राणी पाळताना दुसरीकडे अनाथ कुत्री, मांजरे गाडीखाली मरतात किंवा मानवी रागाचे बळी ठरतात. हा विरोधाभास प्रकर्षांने समोर येऊ लागला त्याचवेळी अनेक सामाजिक संस्था, प्राणीप्रेमी अनाथ प्राण्यांच्या मागे उभे राहिले. गेल्या अनेक वर्षांत याबाबत मोठय़ा प्रमाणावर जागृती होऊ लागली. आता अनाथ प्राणी दत्तक घेण्याला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. ‘आमच्या घरी अमूक प्रजातीचा ‘डॉगी’ आहे..’  हे वाक्य आता ‘आम्ही ना अमूक मेळाव्यातून ‘ऑर्फन डॉगी किंवा किटी’ आणली आहे असे ऐकू येऊ लागले आहे. प्राणी पालक आणि अनाथ प्राण्यांची भेट घडवून आणण्याचे काम स्वयंसेवी संस्थांचे दत्तक मेळावे करत आहेत. पुण्यात काम करणाऱ्या ‘पेट व्हॉयसेस’ या संस्थेकडून गेल्या साधारण ९ वर्षांत जवळपास ४ हजार प्राण्यांना घर मिळाले आहे. संस्थेच्या दर मेळाव्यात २५ ते ३० कुत्र्यांची आणि मांजराची पिल्ले दत्तक जातात. ब्लू क्रॉस सोसायटीकडूनही अनाथ प्राणी दत्तक घेण्यासाठी मदत केली जाते. पीपल फॉर अ‍ॅनिमलसारख्या संस्थाही यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये महाविद्यालयांमध्येही हा उपक्रम सुरू झाला आहे. समाजमाध्यमे, ओएलएक्स सारखी संकेतस्थळे या माध्यमातून अनेक अनाथ प्राण्यांना घरे मिळत आहेत.

दत्तक मेळाव्यात सशक्त पिल्ले

प्राणी विकत घेण्यामागे तो निरोगी असण्याची हमी हा घटक महत्त्वाचा ठरत आला आहे. मात्र दत्तक मेळाव्यांमध्ये असणारी पिल्ले ही निरोगी आणि सशक्त असतील याची काळजी संस्थांकडून घेण्यात येते. त्याचबरोबर पिल्लू दत्तक घेतले की त्याचा सांभाळ केला जाईल याचीही खातरजमा केली जाते. एखाद्या ठिकाणी कुत्री किंवा मांजरीची पिल्ले दिसल्यानंतर संस्थांचे स्वयंसेवक ती पिल्ले स्वत:च्या घरी आणतात. आईपासून वेगळी झालेली पिल्लेच आणली जातात. या पिल्लांचे लसीकरण केले जाते. त्यांना माणसाळवले जाते आणि त्यानंतर दत्तक मेळाव्यामध्ये ही पिल्ले आणली जातात. या मेळाव्यातही पिल्लू दत्तक देण्यापूर्वी त्यांची डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांचेही समुपदेशन केले जाते.

बॉलिवूडकरांकडून पुढाकार

चित्रपटसृष्टी, फॅशन विश्वातील अनेक कलाकार, आंतरराष्ट्रीय खेळाडू हे त्यांच्या कामासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत तसेच त्यांच्या प्राणीप्रेमासाठीही प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षांपासून अनाथ प्राण्यांच्या दत्तक मेळाव्यांना हजेरी लावणे हा बॉलिवूडमधील ट्रेंड झाला आहे. प्रतिष्ठेचे चिन्ह, फॅशन म्हणून महागडय़ा प्रजातींची कुत्री घरी बाळगणारी ही मंडळी अनाथ प्राण्यांना दत्तक घेण्याबाबत आवर्जून जागृती करताना दिसत आहेत. अगदी अलीकडच्या काळात अलिया भट, विराट कोहली, सैफ अली खान यांनी मुंबईतील दत्तक मेळाव्यांना हजेरी लावली आहे. अनाथ कुत्र्यांनी ‘ब्राझिल ओपन’मध्ये बॉल बॉईजचे काम केले. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. चंदिगडच्या महापौरांनीच अनाथ प्राणी दत्तक घेण्याचे आवाहन केले. मुंबईत अनाथ प्राण्यांचा फॅशन शो रंगला अशा जगाच्या पाठीवर सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे असेल किंवा प्रश्नाचे गांभीर्य कळल्यामुळे असेल पण ‘मोकाट’ प्राण्यांबाबत फक्त ‘उपद्रव’ म्हणून पाहण्याच्या नजरेत आता बदल होऊ लागला आहे.

rasika.mulye@expressindia.com