पुणे : आघाडीच्या फॅशन डिझायनर निवेदिता साबूत यांच्या कल्याणीनगर भागातील वस्त्रदालनातून चोरट्यांनी रोकड, तसेच कपडे असा एक लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत विक्रांत सुभाष इंदुलकर (वय २६, रा. वृंदावन सोसायटी, पंचवटी, पाषाण) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅ्शन डिझायनर निवेदिता साबू यांचे कल्याणीनगर भागातील सम्राट सोसायटीत निवेदिता प्रेट अँड काऊचर वस्त्रदालन आहे. वस्त्रदालनाचा दरवाच्या कुलूप तोडून चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख ५७ हजारांची रोकड, सहा महागडे शर्ट असा एक लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी वस्त्रदालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात तीन चोरटे वस्त्रदालनात चोरी करत असल्याचे आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
हेही वाचा >>>पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविलेल्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने घेतले दगडूशेठ गणपतीचं दर्शन
बाॅलिवूडमध्ये निवेदिता साबू प्रसिद्ध
निवेदिता साबू आघाडीच्या फॅशन डिझायनर आहेत. त्यांची पुणे, मुंबईत वस्त्रदालने आहेत. पॅरिस येथील फॅशनी विकमध्ये साबू यांनी तयार केलेल्या डिझायनर कपड्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. बाॅलिवूडमधील अनेक अभिनेते-अभिनेत्रींच्या कपड्यांचे डिझायन साबू यांनी केले आहे. साबू यांनी २०१२ मध्ये कल्याणीनगर भागात वस्त्रदालन सुरू केले होते.