पिंपरी येथील वल्लभनगर एसटी आगारात महामंडळाच्या बसखाली कुत्र्याने खाल्लेल्या लसणी बॉम्बमुळे छोटासा स्फोट घडल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीची सुट्टी सुरू होण्यास अवधी असल्यामुळे आगारामध्ये फारशी गर्दी नव्हती. या छोटय़ाशा स्फोटामुळे आगाराची आणि पर्यायाने प्रवाशांची सुरक्षितता हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास दापोली ते पिंपरी-चिंचवड ही मुक्कामी गाडी फलाट क्रमांक दहावर थांबली होती. तोंडात प्लास्टिकची पिशवी घेऊन चारच्या सुमारास एक कुत्रे त्या गाडीखाली गेले. कुत्रा त्या पिशवीतील पदार्थ चावून खाण्याचा प्रयत्न करीत असतानाच हा स्फोट घडून आला. ही माहिती तातडीने पोलिसांना कळविण्यात आली. पिंपरीचे सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, निरीक्षक सैफन मुजावर यांच्यासह बॉम्ब शोधक आणि नाशकपथक व दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार हा डुक्करांना मारण्यासाठी वापरण्यात येणारा लसणी बॉम्ब आहे. या घटनेमध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळापासून जवळच अशा लसणी बॉम्बच्या पिशव्या आढळून आल्या आहेत. त्यामध्ये किती बॉम्ब आहेत हे अद्याप समजलेले नाही. पथकाचे काम सुरू आहे. या घटनेमुळे वल्लभनगर आगाराची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गारगोटी, सल्फर आणि गनपावडर यापासून बनविण्यात येणाऱ्या लसणी बॉम्बला ‘डुक्कर बॉम्ब’ असेही म्हटले जाते. या डुक्कर बॉम्बला मांस आणि रक्त लावल्यामुळे खाण्याच्या आशेने प्राणी त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळेच खाण्याची वस्तू म्हणूनच कुत्र्याने गाडीखाली असलेली प्लास्टिकची  पिशवी पळविली. मात्र, त्यामध्ये बॉम्ब निघाल्याने खाणे कुत्र्याच्या जीवावर बेतले. या घटनेमध्ये स्फोटक अधिनियमांतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader