पुणे रेल्वे स्थानकात स्फोट घडवून आणण्यासाठी वापरली जाणाऱ्या वस्तूंसारखी एक संशयास्पद वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर तीन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. त्या निकामी करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशन परिसरात घबराट पसरली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला असून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आलीय. बॉम्ब शोधक पथकाने मोकळ्या जागेत या जिलेटीनच्या कांड्या नेऊन निकामी केल्यात. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे स्थानक परिसराचा ते आढावा घेत आहेत. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिकही घटनास्थळी दाखल झाले असून ते घडमोडींवर नजर ठेऊन आहेत.
“साडेदहा वाजता स्थानकावर संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती मिळाली. सध्या जिलेटिन नाही अशी प्राथमिक माहिती आहे. पण तपासणी सुरु आहे. सध्या प्राथमिक माहिती आहे त्यामुळे जास्त सांगू शकत नाही. लोकांनी घाबरण्याचं कारण नाही,” असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटलं आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर संशयास्पद गोष्ट सापडल्याची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सामान्यपणे दुपारी पुणे रेल्वे स्थानकात गजबजाट असणारे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामे करण्यात आलेत. प्रवाशांना सध्या तरी तेथे प्रवेश दिला जात नाहीय. जी संशयास्पद वस्तू आढळून आलेली ती जवळच्या मैदानात नेण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच प्लॅटफॉर्मवरील वाहतूक थांबवण्यात आलीय.
बॉम्ब पथकाच्या सहाय्याने संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरासाची तपासणी करायची की नाही, नेमकी ही वस्तू येथे आली कुठून यासंदर्भातील चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. स्टेशन मास्तर, रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची पुणे रेल्वे स्थानकामधील कार्यालयामध्ये बैठक सुरु असल्याचीही माहिती समोर येत आहे.
इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. मात्र त्यानंतर तपासणी केली असता ही माहिती खोटी असल्याचं उघड झालेलं. त्यानंतर आज ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.