लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बालभारती ते पौड फाटा या बहुचर्चित रस्त्याच्या कामाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या रस्त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या रस्त्याला विरोध करणारी याचिका नागरी चेतना मंचाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिल्याने गेल्या दीड वर्षापासून प्रक्रिया ठप्प झाली होती. हा रस्ता करताना महापालिकेने योग्य प्रक्रियेचा अवलंब केल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) कोथरूड आणि सेनापती बापट रस्त्याला जोडण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून बालभारती ते पौड फाटा रस्ता दाखविण्यात आला आहे. हा रस्ता बालभारती, वेताळ टेकडी येथून सुरू होतो. विधी महाविद्यालयाच्या पाठीमागून हा रस्ता केळेवाडी येथील पौड फाट्याजवळ संपतो. या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याने हा रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेने सुरू केले होते. यासाठीचा प्रकल्प आराखडा तयार केला असून, त्यासाठी २५२ कोटी १३ लाख रुपये इतका खर्च होणार आहे.

दरम्यान, हा प्रस्तावित रस्ता झोपडपट्टीतून जाणार असल्याने या रस्त्याची जागा बदलावी लागली आहे. हा रस्ता आता सुमारे १२५ मीटर लांबून पौड फाट्याला जोडला जाणार आहे. हा बदल केल्याने प्रकल्प खर्च १७ कोटींनी वाढला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च २५२ कोटी १३ लाखांपर्यंत गेला आहे. या कामासाठी सप्टेंबर २०२३ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार होती, पण नागरिकांचा विरोध वाढल्याने हे काम थांबविण्यात आले होते.

टेकडी वाचविण्यासाठी उन्नत मार्ग

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बालभारतीपासून वेताळ टेकडीवरून थेट पौड फाट्यापर्यंत रस्ता प्रस्तावित आहे. कर्वे रस्ता, पौड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, तसेच सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे. महापालिकेकडून या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला होता. त्यांच्याकडून या परिसराचा अभ्यास करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला. त्यामध्ये रस्त्याचा काही भाग जमिनीवरून, तर काही भाग हा उन्नतमार्ग असल्याचे नमूद आहे. या उन्नत मार्गामुळे टेकडी फोडावी लागणार नाही, असा महापालिकेचा दावा आहे.

पर्यावरणप्रेमींचे आक्षेप काय?

‘हा रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने येथील पर्यावरणाची हानी होणार आहे. या कामामुळे येथील पाण्याचे झरे आटतील, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, पुण्यातील टेकड्या, जैवविविधता नष्ट होणार आहे,’ असा आरोप पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे. या रस्त्याच्या विरोधात नागरिकांनी मोर्चादेखील काढला होता.

असा आहे रस्ता

रस्त्याची एकूण लांबी : १.८ किलोमीटर
उन्नत मार्ग : ४०० मीटर
रस्त्याची रुंदी : ३० मीटर
अंदाजे खर्च : २५२.१३ कोटी
वाढीव खर्च : १७ कोटी

महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, हा रस्ता तयार करताना महापालिकेने सर्व अभ्यास केलेला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे प्रकल्प मार्गी लागेल. आवश्यक त्या अटींची पूर्तता करून पुढील निर्णय घेतला जाईल.

पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, बालभारती-पौड फाटा रस्त्याच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हे काम करताना आवश्यक त्या परवानग्या घेऊन रस्ता करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

या रस्त्याच्या विकास आराखड्याबाबत हरकती-सूचना मागवून याचा समावेश डीपीत केला होता, अशी भूमिका महापालिकेने न्यायालयात मांडली, अशी माहिती विधी सल्लागार निशा चव्हाण यांनी दिली. महापालिकेची बाजू योग्य वाटल्याने रस्ता करण्यास परवानगी मिळाली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेटही दाखल केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर म्हणाले, काही राजकीय मंडळींनी या रस्त्याच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण, न्यायालयाने याचिका फेटाळून लावून रस्त्याचे काम करण्यास परवानगी दिली आहे. शहरातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन याचे भूमिपूजन करावे.

Story img Loader