पिंपरी : पोलीस आयुक्तालयाजवळ जलवाहिनी दुरूस्तीसाठी खोदकाम सुरु असताना तीन बॉम्बशेल आढळून आले. पिंपरी – चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्तालयाचे बॉम्ब शोधक-नाशक पथकाने बॉम्बशेलची तपासणी केली असता हे बॉम्बशेल निकामी असल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी (३० ऑक्टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवड – प्रेमलोक पार्क येथील नाल्याजवळ हा प्रकार उघडकीस आला.

चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाजवळ असणार्‍या प्रेमलोक पार्क येथील नाल्याजवळ महापालिकेकडून जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरु होते. खोदकाम सुरु असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास बॉम्बसदृश्य तीन वस्तू सापडल्या. जलवाहिनी दुरुस्त करणार्‍या कर्मचार्‍यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर पिंपरी – चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्तालयाचे बॉम्ब शोधनाशक पथक व श्वानपथक तसेच पिंपरी – चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी सापडलेल्या वस्तु बॉम्बशेल असून त्यांची तपासणी केली असता हे बॉम्बशेल निकामी असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>>थायलंडमध्ये प्रति ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर, फुकेतमध्ये ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ लवकरच खुले

घटनास्थळी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील, चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी भेट दिली. तीनही बॉम्बशेलबाबत अधिक चौकशी व तपास सुरू असून हे बॉम्बशेल सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून संरक्षण विभागाच्या सदन कमांडच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. दरम्यान, यापूर्वीही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बॉम्बशेल आढळले होते. ते बॉम्बशेल निकामी होते.