पुणे : निवडणुकीत समोर कोण आहे, हा प्रश्न कधीच महत्त्वाचा नव्हता आणि नाही. जनतेने ठरवले तर बदल घडतो, हे यापूर्वीही सिद्ध झाले आहे,असे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच, आगामी निवडणुकीतही हे दिसून येईल असे सूचक विधानही त्यांनी केले. त्यामुळे ‘निवडणुकीत समोर आहेच कोण?’ असे म्हणत निवडणूक कथानक मांडण्याचा प्रयत्नच निर्थक ठरतो, असे पवार म्हणाले. सत्ताधाऱ्यांच्या सुडाच्या राजकारणावर भाष्य करताना, असे राजकारण अंतिमत: अंगलट येते, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ राज्य आणि देशाच्या पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’ने तयार केलेल्या ‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती डॉ. बाबा कल्याणी यांच्या हस्ते बुधवारी झाले. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी पवार यांची मुलाखत घेतली, त्या वेळी पवार बोलत होते. पवार यांच्या वाटचालीचा आढावा घेतानाच राज्यातील आणि देशातील वर्तमानातील राजकारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राजकारण, आगामी निवडणुका अशा अंगाने सुमारे तासभर ही मुलाखत रंगली. पवार यांनी या मुलाखतीत अनेक आठवणींतून देशाची, राज्याची वाटचाल उलगडत सध्याचे राजकारण आणि भविष्यातील दिशा यावरही भाष्य केले.

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांच्यासमोर दुसरे नेतृत्व नव्हते, पण वेगवेगळय़ा पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. जनता पक्षाकडून त्या वेळी मोरारजी देसाई पंतप्रधान पदाचे उमेदवार नव्हते. आज तशीच काहीशी परिस्थिती असली, तरी वेगवेगळय़ा पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करण्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले. काँग्रेसच्या काळात सूडाचे राजकारण होत नसल्याचे नमूद करून पवार म्हणाले, की गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारवर सर्वाधिक हल्ले चढवले. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीमध्ये अंतर वाढले होते. मोदी यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी माझ्याशिवाय कोणीही इच्छुक नव्हते. राजकीय मतभेद असले, तरी राज्याच्या विकासाच्या आड येता कामा नये, ही मी मांडलेली भूमिका तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्य केली. काँग्रेसमधील काही नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली होती. मात्र चौकटीच्या बाहेर जाऊ नये आणि सूडाचे राजकारण करता कामा नये या भूमिकेवर मी आणि डॉ. मनमोहनसिंग ठाम होतो. मात्र आता जे काही सुरू आहे ते ठीक नाही. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांपैकी एकच आरोप विचार करण्याजोगा आहे. देशमुख यांनी एका कंपनीकडून चार कोटी रुपये घेतले. ही रक्कम त्यांच्या शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा झाली, सत्तेचा गैरवापर करून ही रक्कम घेण्यात आली, अशी माहिती तपास यंत्रणेची आहे. मात्र देशमुख यांच्यावर सातशे पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या वरून व्यक्ती आणि पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती टोकाचा आहे हे दिसते.

देशाच्या राजकारणात काही राज्यांचा कल निर्णायक असतो. त्यात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा काही राज्यांचा समावेश होतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढवली. मोदी आपल्या राज्यातून उभे राहात असल्याचे कळल्यावर उत्तर प्रदेशातील मतदारांनी हात आखडता घेतला नाही. आमच्यासारख्यांना मात्र अन्य राज्यांतून निवडणूक लढवावीशी वाटली नाही ही आमच्यातील कमतरता असावी किंवा राज्याशी बांधीलकी असावी, असे मत पवार यांनी मांडले.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या काही वर्षांत फारसा बदल झाल्याचे दिसत नाही. त्यांची कितीही कष्ट करण्याची, वेळ देण्याची तयारी असते. आपले काम पूर्णत्वाला नेण्याचा त्यांचा स्वभाव आहे. प्रशासनात अधिक लक्ष घालतात ही जमेची बाजू आहे. मात्र या मध्ये सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून प्रशासनाचे निर्णय होणार नसतील, तर त्याचे परिणाम दिसणार नाहीत. तिथे मला कमतरता दिसते. आपले धोरण, अंमलबजावणीची प्रभावी यंत्रणा यांवर त्यांचे प्रभुत्व आहे. सरकारला पुढे नेण्याची त्यांची वेगळी पद्धत आहे, असे मतही त्यांनी मांडले.‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले. भक्ती बिसुरे यांनी सूत्रसंचालन केले.

आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत..

मला माझ्या वयाची चिंता नसली, तरी नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याची, त्यांच्यातील नेतृत्व पुढे आणण्याची गरज आहे. त्यामुळे आता मी कोणतीही प्रशासकीय जबाबदारी घेऊ इच्छित नाही. राज्य आणि देश नीट चालण्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सल्ला देण्याची भूमिका आहे, असे पवार यांनी सांगितले.

जातीपातीचे राजकारण फार काळ टिकत नाही

महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाविषयी पवार म्हणाले, की जातीचे राजकारण मी कधी केले नाही. महाराष्ट्रामध्येही सर्वसामान्य माणूस जातीपातीचा विचार करत नाही. आम्ही राजकारणी मंडळी स्वार्थासाठी काहीवेळा या धोरणाचा वापर करतो. पण तो फार काळ टिकत नाही. सर्वसामान्य माणूस आणि विकास याच मुद्दय़ांचा विचार केला जातो आणि तो केला गेला पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश निवडणुकीत ५०-५० टक्के शक्यता

आगामी निवडणुकांचा विचार करता उत्तर प्रदेशमध्ये काय होईल सांगता येणार नाही. आठवडय़ातील दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन काही हजार कोटींचे प्रकल्प जाहीर करत आहेत. परिस्थितीची नोंद घेत त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. तेथील निकालाबाबत ५०-५० टक्के शक्यता वाटते. मोदी गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेश सोडून किती ठिकाणी गेले, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.

मोदींची इच्छा होती, पण..

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे अशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती. त्यांनी तसा प्रस्तावही दिला होता. मात्र आमची विचारधारा वेगळी असल्याने हे शक्य होणार नसल्याचे मी पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सांगितले. पण तरीही तुम्ही विचार करा, असे मोदी यांनी सांगितले. राज्यात आमचेही (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) काही जमत नव्हते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला बरोबर घ्यावे हा विचार भाजप नेतृत्वाच्या मनात आला असेल आणि त्यांनी चाचपून पाहिले असेल, ही गोष्ट पवार यांनी प्रथमच जाहीर केली.

देशाच्या प्रगतिपथासाठी पवार कार्यरत

दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व असा लौकिक असलेले शरद पवार देश प्रगतिपथावर कसा जाईल यासाठीच कार्यरत असतात, अशा शब्दांत ज्येष्ठ उद्योगपती डॉ. बाबा कल्याणी यांनी शरद पवार यांचा गौरव केला. पवार अष्टावधानी आहेत, असे या पुस्तकामध्ये म्हटले गेले आहे. पण, केवळ आठच नाही तर आठशे अवधाने पेलण्याची ताकद त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये कृषी व संरक्षणमंत्री या रूपाने महाराष्ट्राला आणि देशाला त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा लाभ झाला आहे. इतकी वर्षे ते संसदेमध्ये काम करत आहेत. देश प्रगतिपथावर कसा जाईल यासाठीच ते कार्यरत असतात. बारामती येथील कृषी विकास केंद्रामध्ये शेतीकामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कशी उपयोगात आणता येईल यासाठी पवार यांनी प्रयोगशाळा उभी केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ यामध्ये सहभागी होत आहे, यामध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असा गौरव डॉ. कल्याणी यांनी केला.

राज्यातील  सरकार भाजपच्या कृपेने..

निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट बहुमत भाजप आणि शिवसेना युतीलाच होते. मात्र उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात नेतृत्वाविषयी जे ठरले होते ते पाळले न गेल्याने उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांच्यातील वाढलेली दरी आमच्यासाठी संधी होती, ती आम्ही साधली. त्यामुळे राज्यातील सरकार भाजपच्या कृपेने आहे. बाळासाहेब ठाकरे हे माझे मित्र असल्याने मी मित्राच्या मुलाच्या पाठीशी आहे, असेही पवार म्हणाले.

अजित पवारांनी अर्धवट काम केले नसते..

राज्यात भाजपबरोबर अजित पवारांना शरद पवार यांनीच पाठवले, या चर्चेबाबत विचारले असता, ‘मी पाठवले असते तर अजित पवार यांनी सरकारच बनवले असते. असे अर्धवट काम केले नसते,’ असे उत्तर पवार यांनी देताच सभागृहात हास्यस्फोट झाला.

-: टायटल पार्टनर :-

एस.एस. इंजिनियर्स

-: असोसिएट पार्टनर :-

अमानोरा पार्क टाउन

मगरपट्टा सिटी ग्रुप

-: पॉवर्ड बाय :-

इंडियाना सुक्रो-टेक (पुणे) प्रा. लि.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे

सुरतवाला बिझिनेस ग्रुप

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book ashtavadhani on sharad pawar release girish kuber interview sharad pawar zws