सर्वच खासदारांना लोकसभेमध्ये बोलण्याची संधी मिळतेच असे होत नाही. मात्र, तरीही लाखो मतदारांचे प्रतिनिधी म्हणून ते त्यांचे काम करीतच असतात. संसदेच्या वेगवेगळ्या समित्यांमध्येही ते त्यांची मते मांडतात. करोडो रुपयांची उलाढाल करणारा एखादाच खासदार असतो. मात्र, मतदार त्याला खपवून घेतात. एवढेच नव्हे तर त्याला निवडूनही देतात, अशी टिप्पणी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी रविवारी केली.
साकेत प्रकाशनतर्फे ज्येष्ठ पत्रकार अभिलाष खांडेकर यांच्या ‘बुकशेल्फ’ या पुस्तकाचे प्रकाशन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे, लेखक-समीक्षक संजय भास्कर जोशी आणि प्रकाशक बाबा भांड या वेळी उपस्थित होते. या पुस्तकातून खांडेकर यांनी ६० इंग्रजी पुस्तकांचा परिचय करून दिला आहे.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, सध्याची पिढी बिघडली आहे. काही वाचत नाही अशी चर्चा सातत्याने केली जाते. मात्र, किती पालक आपल्या मुलांना पुस्तके आणून देतात आणि त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करतात हा खरा प्रश्न आहे. घरामध्ये पुस्तके असतील तर ती उत्सुकतेने वाचली जातात. कित्येकदा पुस्तके खरेदी करायला गेल्यानंतर आपण नेमके काय घ्यायचे हे मुलांना कळत नाही. त्यासाठी मुलांमध्ये चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची अभिरुची निर्माण करायला पाहिजे. इतिहासलेखन हा महत्त्वाचा विषय असून आपल्याकडे योग्य पद्धतीने इतिहासाचे लेखन झालेले नाही. या विषयामध्ये मुलांना आवड निर्माण करण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे असे काही वेळा वाटते.
पुस्तके वाचल्याशिवाय दृष्टी मिळत नाही, असे सांगून भानू काळे म्हणाले, इंग्रजी पुस्तकांचा मराठीमध्ये परिचय करून दिला जातो. त्याप्रमाणेच चांगल्या मराठी पुस्तकांचाही इंग्रजीमध्ये परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. भाषिक बंधनाच्या कारणामुळे आतापर्यंत मराठी लेखक खऱ्या अर्थाने जगापुढे आलेले नाहीत. ही उणीव दूर होण्याची आवश्यकता आहे.
पुस्तकांविषयीचे पुस्तक ही चांगली कल्पना आहे. वाचनातील अभिरुचीचा प्रवास हा ज्याचा त्यानेच करावयाचा असतो. खांडेकर यांनी पुस्तकांचे मूल्यमापन न करता निर्भेळ मनाने परिचय करून दिला असल्याने हे पुस्तक इंग्रजी पुस्तकांचे वाटाडे झाले असल्याचे मत संजय भास्कर जोशी यांनी नोंदविले. ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा