महाराष्ट्र राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ ते १० मार्च दरम्यान ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सव येथील टिळक स्मारक मंदिर येथे होईल.
तीन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात काव्य संध्या, परिसंवाद, कथाकथन, आठवणीतल्या मुलाखती, कवयित्री संमेलन आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात वीस प्रकाशन संस्थांचे स्टॉल असणार आहेत.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे व जिल्हाधिकारी विकास देशमुख या वेळी उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता ‘काव्यसंध्या’ या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, उद्धव कानडे, विवेक सबनीस, अनिल कांबळे, युवराज पाटील आदी सहभागी होणार आहेत.
शनिवारी ९ मार्च रोजी ४.३० वाजता ‘सध्याची पत्रकारिता मराठी साहित्य निर्मितीस पोषक आहे काय?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यात ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ‘केसरी’चे संपादक दीपक टिळक, ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक पराग करंदीकर आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे सहभागी होणार आहेत.
रविवार दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ‘मराठी प्रकाशन व्यवसायासमोरील नवी आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादात पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी, साधना प्रकाशनचे विनोद शिरसाट आणि जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर सहभागी होणार आहेत. ग्रंथोत्सवाचा समारोप कवयित्री संमेलनाने होईल. या संमेलनात श्रीमती ज्योत्स्ना चांदगुडे, आसावरी काकडे, मीनल बाठे, संगीता बर्वे, मीरा शिंदे, मृणालिनी कानेटकर, मीरा शिरसमकर आणि वैशाली मोहिते यांचा सहभाग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा