दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी निघणार आहे. महाराष्ट्रातून घुमानला जाणाऱ्या दिंडय़ांसह शीख बांधवांचा सहभाग असलेली ग्रंथदिंडी हे घुमान संमेलनाचे आगळेवेगळे वैशिष्टय़ ठरणार आहे.
कवी नारायण सुमंत यांच्या नेतृत्वाखाली मोडनिंब येथून निघणारी कृषीिदिंडी आणि नांदेड येथून श्री नानकसाई फाउंडेशनतर्फे निघणारी दिंडी अशा राज्यातून दोन दिंडय़ा घुमानला पोहोचणार आहेत. याखेरीज नागपूर जिल्ह्य़ातील चिखली येथूनही एक दिंडी रेल्वे प्रवासामार्गे घुमानला येणार आहे. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे हे संमेलनाचे नियोजित अध्यक्ष असल्यामुळे आळंदी आणि देहू येथून काही वारकरी संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी घुमान येथे जाणार आहेत. घुमान हे छोटेसे गाव असल्याने एक ठराविक मार्ग निश्चित करून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीमध्ये शीख समाजाचा मोठा सहभाग असेल. शीख बांधवांचे ढोलक पथक आणि शबद कीर्तन करणारा जथा या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होणार असून िदडीमध्ये सर्व संतांचे साहित्य ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.
चिपळूण येथे झालेल्या साहित्य संमेलनानंतर सासवड येथील संमेलनात ग्रंथदिंडीऐवजी ग्रंथजागर हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला होता. सासवड हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी मार्गावरील गाव असल्यामुळे तेथील लोकांना दिंडीचे नावीन्य नव्हते. त्यामुळे साहित्य महामंडळाने संयोजक संस्थेच्या सहकार्याने ग्रंथजागर हा प्रयोग राबविला. सासवड परिसरातील वेगवेगळ्या भागातून संतवचने आणि मराठी अभिजात कविता म्हणत संमेलनस्थळी पोहोचले हाेते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत संमेलनाची वातावरण निर्मितीदेखील झाली. हा प्रयोग यशस्वी झाला असल्याचा दावाही वैद्य यांनी केला. मात्र, यंदा संयोजकांच्या मागणीनुसार ग्रंथदिंडी काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सासवड येथील संमेलनाच्या धर्तीवर घुमान संमेलनामध्येही महाकोश निधी संकलनासाठी दानपेटय़ा ठेवण्यात येणार आहेत. जोपर्यंत सरकारच्या मदतीविना संमेलन घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती सुदृढ होत नाही तोपर्यंत दानपेटय़ा ठेवून मराठी बांधवांकडे निधीची मागणी करावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
म्हणून गेल्या वर्षीच्या ग्रंथदिंडीला सुटी
चिपळूण येथे झालेल्या संमेलनात मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी काढण्याचे संयोजकांनी जाहीर केले होते. मात्र, तेथील सनातनी मुस्लिमांच्या विरोधामुळे ऐनवेळी ग्रंथदिंडीचा मार्ग बदलण्यात आला होता. त्या पाश्र्वभूमीवर पुरोगामी आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी हमीद दलवाई यांच्या निवासस्थानापासून स्वतंत्र ग्रंथदिंडी काढली होती. त्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर सासवड येथील संमेलनामध्ये ग्रंथदिंडीला सुट्टी देण्यात आली होती. मात्र, आता घुमान येथील संमेलनामध्ये ग्रंथदिंडी निघणार असल्याने गाडी मूळपदावर आली असल्याची चर्चा साहित्य वर्तुळामध्ये आहे.