मावळ लोकसभेसाठी शिवसेनेचे दावेदार मानले जाणारे श्रीरंग बारणे यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी राष्ट्रवादीचे गतवेळचे उमेदवार आझम पानसरे यांनी लावलेल्या हजेरीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिवंगत रामकृष्ण मोरे यांचे अनुयायी असलेले बारणे-पानसरे यांची मैत्री सर्वश्रुत असून समान शत्रू असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचा ‘वेध’ घेण्यासाठी लोकसभेच्या रणांगणातही बारणेंच्या धनुष्याला पानसरेंचा बाण राहील, असेच संकेत आहेत.
बारणेंच्या ‘शब्दवेध’ या भाषणसंग्रहाचे प्रकाशन माजी मंत्री लीलाधर डाके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. रामचंद्र देखणे होते. संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर, खासदार शिवाजीराव आढळराव, जिल्हाप्रमुख मच्िंछद्र खराडे, बाबा धुमाळ आदी उपस्थित होते. बारणेंचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी खासदार गजानन बाबर अनुपस्थित होते. तर, आझम पानसरेंची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. २००९ मध्ये पानसरे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, ते बाबरांकडून पराभूत झाले. यंदा राष्ट्रवादीकडून लक्ष्मण जगतापांचे नाव आघाडीवर आहे. जगतापांनी विरोधात काम केल्याचा राग पानसरेंच्या डोक्यात आहे. त्याचे उट्टे येत्या निवडणुकीत ते काढतील, असे स्पष्ट चित्र आहे. बारणे सेनेचे उमेदवार ठरल्यास पानसरेंचे पाठबळ त्यांना मिळेल, अशा हालचाली असून त्याचाच प्रारंभ यानिमित्ताने झाल्याचे मानले जाते. यावेळी पानसरे म्हणाले, बारणे मित्र असून त्यांच्यासाठी प्रथमच पक्षभेद विसरून दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर गेलो आहे. ते अभ्यासू नेते असून चांगल्या कामांना आपण नेहमीच पाठिंबा दिला आहे. डाके म्हणाले, लोकप्रतिनिधींनी जनतेची कामे करताना उक्ती व कृतीत फरक करू नये. कीर्तीकर म्हणाले, जनतेचे प्रश्न हाती घेऊन बारणे ध्यासाने काम करत आहेत. आढळराव म्हणाले, जनहिताच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष बारणेंनी वेधले. बारणे जागरूक लोकप्रतिनिधी असल्याचे डॉ. देखणे यांनी नमूद केले. प्रास्ताविकात बारणे यांनी शब्दवेधचे स्वरूप स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा