दुरुस्तीची सबब पुढे करून सभागृह देण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे आणि महापालिकेने परवानगी नाकारल्याचे कारण सांगत पोलिसांनी रोखल्यामुळे बहुचर्चित इशरत जहाँ चकमकीच्या घटनेवर पुस्तक प्रकाशन कार्यक्रम रद्द करावा लागला. कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून लवकरच कार्यक्रमाची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.
मुंब्रा येथील रहिवासी इशरत जहाँ या युवतीसह अन्य तरुणांना २००४ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले होते. ही चकमक बनावट असल्याचा दावा ‘इशरत जहाँ एन्काऊंटर’ या नवीन पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी नुकतेच इशरत जहाँची आई शमीमा कौसर व अन्य व्यक्तींच्या उपस्थितीत मुंब्रा येथे या पुस्तकाचे प्रकाशन केले होते, असे आयोजकांकडून सांगण्यात आले होते.
या पुस्तकाचा पुण्यातील प्रकाशन कार्यक्रम मंगळवारी गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. न्या. बी. जी. कोळसे पाटील, माजी पोलीस महासंचालक श. मि. मुश्रीफ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू असल्याने येथे कार्यक्रम करण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यापूर्वी या कार्यक्रमासाठी आझम कॅम्पस व्यवस्थापनानेही सभागृह नाकारले होते.
हेही वाचा – पुणे : पारगावमध्ये भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या
हेही वाचा – पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाला मनसेची साथ?
कार्यक्रमाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फुले स्मारक सभागृहाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. महापालिकेची परवानगी नसल्याने हा कार्यक्रम होऊ दिला नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून, लवकरच पुढील तारीख निश्चित करण्यात येईल,’ असे आयोजक मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अंजुम इनामदार यांनी सांगितले. त्यानंतर इनामदार यांनी महात्मा फुले स्मारक येथे या कार्यक्रमासाठी परगावाहून आलेल्या पाहुण्यांशी चर्चा केली. कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.