पुणे : साने गुरुजी यांचा सहवास लाभलेले आणि साने गुरुजी यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले ज्येष्ठ बालसाहित्यकार वसंत नारायण उर्फ राजा मंगळवेढेकर लिखित ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ हे पुस्तक साधना प्रकाशनाने आता ऑडिओ बुक स्वरूपात आणले आहे. मंगळवेढेकर यांची जी पुस्तके अन्य प्रकाशकांकडे होती, मात्र दीर्घ काळ अनुपलब्ध आहेत; त्यातील विशेष महत्त्वाची पुस्तकेही साधना प्रकाशनाकडून आगामी वर्षभरात प्रकाशित करण्यात येणार आहेत.
मंगळवेढेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष बुधवारपासून (११ डिसेंबर) सुरू होत असून, हे औचित्य साधून ते ध्वनी स्वरूपात उपलब्ध होत आहे. सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटात श्यामच्या आईची भूमिका साकारणाऱ्या गौरी देशपांडे या युवा अभिनेत्रीच्या आवाजात हे ३० तासांचे ‘ऑडिओ बुक’ तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा – शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
साने गुरुजी यांच्या पंचविसाव्या स्मृतिदिनानिमित्त, १९७५ मध्ये राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेले ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केले होते. साने गुरुजींचे संपूर्ण जीवन आणि कार्य समजून घेण्यासाठी ते सर्वोत्तम पुस्तक मानले जाते. ‘एवढे एकच पुस्तक लिहून जरी राजाभाऊ थांबले असते, तरी त्यांचे नाव मराठी साहित्यात कायम राहिले असते,’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी व्यक्त केली होती.
‘साने गुरुजींच्या सव्वाशेव्या जन्मदिनाचे औचित्य साधून साधना प्रकाशनाने गेल्या वर्षी या पुस्तकाची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली. आता हे संपूर्ण पुस्तक साधना प्रकाशनाने ‘ऑडिओ बुक’ स्वरूपात तयार केले आहे,’ अशी माहिती ‘साधना साप्ताहिक’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी दिली.
१९६० ते १९९० या काळात राजाभाऊंचे साधना साप्ताहिकातून शंभराहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. गाणी, गोष्टी, कथा, व्यक्तीलेख असे साहित्य त्यामध्ये आहे. त्यातील निवडक गोष्टी आणि लेख यांचा संग्रह असलेले पुस्तक राजाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात साधना प्रकाशनाकडून येणार आहे. – विनोद शिरसाठ, संपादक, साधना साप्ताहिक
हेही वाचा – बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
बालगीतांची मोहिनी
‘असावा सुंदर चाॅकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला’ आणि ‘कोणास ठाऊक कसा, सर्कशीत गेला ससा’ ही बालगीते ऐकत अनेक लहान मुले मोठी झाली. राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेल्या बालगीतांची मोहिनी अजूनही रसिकांच्या मनावर कायम आहे. ‘उर्मिले त्रिवार वंदन तुला’ आणि ‘दिव्यत्वाला चुकले नाही दिव्य सदा भाळी, सती तू दिव्य रूप मैथिली’ ही त्यांची भावगीते प्रसिद्ध आहेत.