जुनी पुस्तके खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘व्हॉट्स अॅप’ ग्रुप तयार झाला आहे. जुन्या पुस्तकांचे मोल जाणणाऱ्या वाचकांना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्यामध्ये अडकवित विक्रेत्याने जुन्याची आस असलेल्यांसाठी नव्या माध्यमाची कास धरली आहे.
डेक्कन परिसरातील खंडुजीबाबा मंदिराच्या दारामध्ये रस्त्याच्या कडेला समीर कलारकोप यांचे जुन्या पुस्तकांच्या विक्रीचे दालन आहे. गेल्या चार दशकांपासून हा छोटेखानी संसार अस्तित्वात आहे. आरंभीची दोन दशके वडिलांनी काम केल्यानंतर गेल्या दोन दशकांपासून समीर हे वाचकांच्या सेवेमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, हा पारंपरिक व्यवसाय करताना आधुनिकतेचा वसा घेत समीर यांनी ‘व्हॉट्स अॅप’च्या माध्यमातून ग्रुप निर्माण केला आहे. ‘ओल्ड बुक्स डेक्कन ग्रुप’ असे त्याचे नाव असून गेल्या दोन महिन्यात जुनी पुस्तके खरेदी करणारे ५० ग्राहक या ग्रुपचे सभासद झाले आहेत.
इंग्रजीतील अभिजात कादंबऱ्या, मराठीतील श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृती, विश्वकोश, शद्बकोश, संदर्भकोश, माहितीकोश, इतिहास-तत्त्वज्ञान आणि विज्ञान या विषयावरील पुस्तके, जुने दिवाळी अंक, स्पर्धा परीक्षा पुस्तके, ब्रेन डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्त्व विकास या विषयावरील पुस्तकांचा खजिना संभाजी पुलाच्या शेवटच्या टोकाला सापडतो. लेखक, प्राध्यापक, अभियंते, डॉक्टर अशा समाजातील विविध घटकांसह सामान्य वाचनप्रेमी आमचे ग्राहक आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुपची निर्मिती केली आहे. दरवेळी नवे लोक या ग्रुपला कनेक्ट होतात. तर, काहीजण त्यातून बाहेर पडत असले तरी सरासरी ५० लोक या ग्रुपचे सभासद असतात. त्यांच्यासाठी मी नव्याने आलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठ अपलोड करतो. मग, सदस्य आपल्याला हवे असलेले पुस्तक मेसेजच्या माध्यमातून नोंदणी करून बाजूला ठेवायला सांगतात. दरमहा होणाऱ्या उलाढालीमध्ये २० टक्के योगदान व्हॉट्स अॅप सभासदांचे आहे, असेही समीर यांनी सांगितले.
आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांपैकी अनेकजण सधन आहेत. पण, नव्या पुस्तकाची खरेदी करण्यापेक्षा तेवढय़ाच रकमेमध्ये येथे अधिक पुस्तकांची खरेदी करून वाचनाची भूक भागविता येते. ज्येष्ठ लेखक निरंजन घाटे, अनंत भावे, कवी म. भा. चव्हाण हे सातत्याने भेट देऊन जुनी पुस्तके नव्याने खरेदी करतात, असेही त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा