जलदगती बससेवेसाठीच्या (बस रॅपीड ट्रान्सपोर्ट- बीआरटी) मार्गातून मोठ्या प्रमाणावर होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी बीआरटी स्थानकांवर स्वयंचलित बूम बॅरिअर्स बसविण्यात आले आहेत. बीआरटी मार्गातील प्रवास वेगाने आणि विनाअडथळा होण्यासाठी विविध मार्गांवर १४८ ठिकाणी बूम बॅरिअर्स बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी बॅरिअर्सला कॅमेरे बसविण्यात आले असून खासगी गाड्यांचे क्रमांक त्याद्वारे कळणार आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या खासगी वाहनांवरील कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी बीआरटी योजना राबविण्यात आली आहे. हा मार्ग केवळ पीएमपीच्या गाड्यांनीच वापरणे अपेक्षित आहे. मात्र खासगी वाहने या मार्गात घुसखोरी करतात. त्यामुळे बीआरटीचा उद्देश फोल ठरत असून वेगालाही फटका बसत आहे.
खासगी गाड्यांच्या घुसखोरीने प्राणांकित अपघातही झाल्याची नोंद आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्यानंतरही खासगी वाहनांची घुसखोरी थांबत नसल्याने आता बूम बॅरीअर्स बसविण्यात येत आहेत. यापूर्वीही असा प्रयोग पीएमपीने राबविला होता. मात्र अपु-या यंत्रणेमुळे तो यशस्वी ठरला नव्हता.
बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या खासगी वाहनांची छायातित्रे स्वंचलित कॅमे-याने टिपली जाणार आहेत. त्याची माहिती वाहतूक पोलिसांना दिली जाईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या १२ ठिकाणी ही उपाययोजना राबविण्यास सुरूवात झाली आहे. एकूण १४८ ठिकाणी या पद्धतीचे कॅमेरे बसविण्यात येतील. कॅमे-याच्या कक्षात वाहन आल्यानंतर वाहनाचे छायाचित्र आणि क्रमांकाची नोंद होईल.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या १ हजार ५०० गाड्या आहेत. या सर्व गाड्यांच्या क्रमांकाची नोंद कॅमे-यात संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील गाड्या या मार्गावरून धावू शकतील. मात्र पीएमपी व्यतिरिक्त जी खासगी वाहने बीआरटी मार्गात प्रवेश करतील, त्यांची काही सेकंदात स्वयंचलित नोंद होईल. त्याची माहिती पीएमपीकडून वाहतूक पोलिसांना दिली जाईल. त्याची छायाचित्रेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गातील खासगी वाहनांची घुसखोरी थांबेल, असा दावा पीएमपीने केला आहे.
बीआरटी मार्गातील घुसखोरी रोखण्यासाठी पीएमपीने यापूर्वीही असा प्रयोग केला होता. त्यानंतर वॉर्डन नियुक्त केले होते. मात्र घुसखोरी थांबली नव्हती. आता पुन्हा हा प्रयोग नव्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे. मात्र बीआरटी मार्गातील घुसखोरी थांबणार का, हा प्रश्न कायम आहे.