पुणे: शहराच्या कोणत्याही भागातून पुणे विमानतळावर येणे सुलभ व्हावे यादृष्टीने विमानतळाची ‘कनेटिव्हिटी’ वाढविण्यात येणार आहे. त्यानुसार खडकवासला ते खराडी ही मेट्रो मार्गिका विमानतळाला जोडण्याचे विचाराधीन आहे. त्याबाबतचे नियोजन सुरू झाले असून मेट्रो मार्गिकांचा विस्तार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) करण्यासाठी महापालिकांनी निधी द्यावा आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनेने डीपीआर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, वाढत्या विमान प्रवाशांमुळे आगामी पन्नास ते शंभर वर्षांचा विचार करून पुणे विमानतळाचा विस्तारही करण्यात येणार आहे. त्यासाठी २०० एकर जागेची आवश्यकता असून त्यातील २५ एकर जागा संरक्षण विभागाकडून घेण्यात येणार आहे. तर, ६५ एकर खासगी जागेचे हस्तांरण करण्यात येणार असून उर्वरीत जागा संपादनासाठीची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ सल्लागार समितीची (एएसी) बैठक झाली. तीन वर्षानंतर होत असलेल्या या बैठकीत विमानतळाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर मोहोळ यांनी त्याबाबतची माहिती दिली. पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह व्यापार, उद्योग, पर्यटन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.
पुण्यातील सध्याचे सर्व चार मेट्रो मार्गिका थेट पुणे विमानतळाशी जोडण्यात येणार आहेत. निगडी ते स्वारगेट, हिंजवडी ते शिवाजीनगर, वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे मार्ग विमानतळाशी जोडून कनेटिव्हिटी वाढविण्याचे नियोजित आहे. खडकवासला ते खराडी ही मेट्रो मार्गिकाही विमानतळाला जोडण्यात येणार आहे. त्यासद्र्भात मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांबरोबर चर्चा झाली असून भारतीय विमानतळ प्राधिरण आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबरही चर्चा करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका महापालिकांच्या अखत्यारित येत असल्याने त्यांनी विमानतळापर्यंतच्या विस्तारीत मार्गिंकाचा डीपीआरसाठी निधी द्यावा आणि महामेट्रोने डीपीआर करावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे,’ असे मोहोळ यांनी सांगितले.
विमानतळाशी संबंधित विषयांवर चर्चा
विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत धावपट्टी विस्ताराबाबतही चर्चा करण्यात आली. मोठ्या आकाराच्या विमानांना सामावून घेण्यासाठी आणि एकूण उड्डाणांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मेट्रोची कनेटिव्हिटी वाढविणे आवश्यक ठरणार आहे. त्यादृष्टीने शहराची वाहतूक पायाभूत सुविधांशी जोडण्याच्या मुद्द्यालाही या बैठकीत प्राधान्य देण्यात आले. तसेच विमानतळ परिसरातील पक्षी आणि प्राण्याच्या हालचालींमुळे होणारे धोके कमी करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्न करण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच टर्मिनलमधील पायाभूत सुविधांच्या विस्तार योजनांचाही आढावा घेण्यात आला.
विमानतळ विस्तारासाठी दोनशे एकर जागेची आवश्यकता
येत्या पन्नास ते शंभर वर्षांचा विचार करून पुणे विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी २०० एकर जागेची आवश्यकता असून त्यातील २५ एकर जागा संरक्षण विभागाकडून घेण्यात येणार आहे. त्याबदल्यात संरक्षण विभागाला दुसरीकडे जागा दिली जाणार आहे. तर, ६५ एकर खासगी जागेचेही हस्तांतरण करण्यात येणार असून उर्वरीत जागेसाठीही चर्चा सुरू झाल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी ‘ओएलएस’ सर्वे झाला असून सर्व विभागांसमवेत बैठका सुरू आहेत. भूसंपादनाचे काम राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे. विमानतळालगता रस्ता विमानतळ परिसरात येणार असल्याने या रस्त्याला पर्यायी रस्ता करावा लागणार असून पुणे महापालिका त्यासाठी ६५ कोटींचा खर्च करणार आहे. कार्गोसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असेही मोहोळ यांनी सांगितले.
पुण्यातून दररोज २०० विमानांची ये-जा होत असून ५२ हजार चौरस मीटर क्षेत्रावर नवीन टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. जुन्या टर्मिनलचाही पुनर्विकास करण्यात येणारअ सून नव्याने काही ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. धावपट्टी विस्तारीकरणासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री