Bopdev Ghat Incident News: पुण्यातील बोपदेव घाट येथे मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर एका आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. मात्र दोन आरोपी फरार आहेत. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी रेखाचित्र जाहीर केले असून तीनही आरोपींचे सीसीटीव्ही फुजेटही समोर आले आहे. गुरुवारी (दि. ३ ऑक्टोबर) रोजी हा गुन्हा घडला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींचे रेखाचित्र तयार करून पोलीस ठाण्यात पाठविले गेले आहे. पीडिता आणि तिच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे, एका आरोपीचे चित्र ९० टक्के मिळतेजुळते असून दुसऱ्या आरोपीचे चित्र ७० टक्के जुळत आहे. हे दोन्ही चित्र पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केले असून दोन्ही आरोपींची काहीही माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

या चित्राच्या आधारावर पोलिसांचे १४ पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच पीडितेवर पुण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचे समुपदेशनही केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे वाचा >> Bopdev Ghat Crime : “तरुणाला बांधलं आणि त्यानंतर २१ वर्षांच्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार..”, पोलिसांनी सांगितला बोपदेव घाटातला घटनाक्रम

दरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीनही आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुजेटही समोर आले आहे.

एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये तिघे आरोपी दिसत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. घटनेनंतर १५ मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. सदर फुटेज शुक्रवार (४ ऑक्टोबर) रात्री १.३६ वाजताचे आहे.

हे ही वाचा >> Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!

बोपदेव घाटात त्यादिवशी काय झाले?

गुरुवारी रात्री २१ वर्षीय मुलगी तिच्या मित्रासह पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरायला गेली होती. तिथेच एका आरोपीने त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्याच्या इतर दोन मित्रांना बोलावून मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तिच्या मित्राला एका झाडाला शर्ट आणि पट्ट्याने बांधून ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अत्याचार केल्यानंतर तीनही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर पहाटे पीडित मुलगी आणि तिचा मित्र जखमी अवस्थेत आढळून आले. पीडितेच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचे निदर्शनास आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bopdev ghat gangrape case cctv footage of three alleged suspects goes viral pune police release sketches of accused kvg