बोपखेल ग्रामस्थ आणि लष्कर यांच्यात वर्षांनुवर्षे रस्त्याच्या वापरावरून सुरू असलेल्या संघर्षांचा गुरुवारी उद्रेक झाल्यानंतर शुक्रवारी संपूर्ण गावात भयाण शांतता आहे. पोलीसांनी याप्रकरणी १७४ जणांवर दंगल घडविल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये ७६ महिलांचाही समावेश आहे. गावामध्ये जमावबंदी लागू असून, ग्रामस्थांनी शुक्रवारी सर्व व्यवहार बंद ठेवले.
लष्कराने बंद केलेला सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचा रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांच्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. त्यातून पोलिसांच्या गाडय़ा फोडण्यात आल्या. पोलिसांनीही आंदोलकांवर तुफान लाठीमार केला. या घटनेत सुमारे २०० नागरिक तसेच २३ पोलीसही जखमी झाले आहेत. शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱहे यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयात जाऊन जखमी ग्रामस्थ आणि पोलीसांची विचारपूस केली. काल घडलेल्या घटनेमागे काहीतरी षडयंत्र आहे. त्यामुळे याची चौकशी केली जावी आणि सूत्रधारांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. भाजपचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांनी लष्कराच्या अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांच्याकडे या रस्त्यासंदर्भात चर्चा केली.
पोलीसांनी १७४ जणांवर दंगल घडविल्याचे गुन्हे दाखल केले असल्याचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले. १२ अल्पवयीन मुलांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. कालच्या घटनेनंतर गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा