पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा पळून जाण्याच्या घटनेला आज दहा दिवसांचा कालावधी झाला. तर या प्रकरणी ललित पाटील याचा शोध सुरू होता. त्याचदरम्यान आरोपी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघा आरोपींना उत्तर प्रदेश येथून पुणे पोलिसांनी काल अटक केली. त्यानंतर आज शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघा आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हेही वाचा – अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार करणारा गजाआड
आरोपी भुषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना न्यायालयाने तुमचे वकील कोण असे विचारले असता आम्ही वकील घेतला नसल्याचे त्यांनी न्यायाधीशांनी सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी या दोन आरोपींना सरकारी खर्चातून वकील देण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयात हजर असलेल्या वकिलांना तुमच्यापैकी कोणी या दोन आरोपींचे वकीलपत्र घेण्यास तयार आहे का ? असे विचारले. त्यानंतर न्यायालयात उपस्थित वकिलांपैकी अॅड चैतन्य दिक्षित आणि यशपाल पुरोहित यांनी आरोपींचे वकीलपत्र स्वीकारले. त्यावेळी सरकारी वकिलांनी १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. त्या मागणीला बचाव पक्षाच्या वकिलांनी विरोध दर्शविला. त्यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यावर न्यायाधीशांनी १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.