लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी आणि त्यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या पोलीस ठाण्यांची हद्द निश्चिती करण्यात आली आहे. गृह विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत सात नवीन पोलिस ठाण्यांना मान्यता दिली. त्यासाठी ८१६ नवीन पदांची निर्मिती देखील करण्यात आली आहे. या सात नवीन पोलीस ठाण्यांचे उद॒घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑक्टोंबर २०२४ मध्ये करण्यात आले होते. त्यानुसार आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी या नव्या सात पोलीस ठाण्यांचे काही दिवसांपासून प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे विभाजन करून आंबेगाव, चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे विभाजन करून बाणेर, लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करून वाघोली, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे विभाजन करून नांदेड सिटी, हडपसर पोलीस ठाण्याचे विभाजन करून फुरसुंगी, तर चंदननगर आणि लोणीकंद पोलिस ठाण्याचे विभाजन करून खराडी पोलीस ठाणे अशा सात पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आह. या पोलीस ठाण्यांची आता हद्द निश्चिती करण्यात आली आहे.

अशी आहे हद्द

  • काळेपडळ पोलीस ठाण्याची हद्द मंतरवाडी चौकापासून कात्रज रोड ते मिरज रेल्वे लाईनपर्यंत  (महमंदवाडी पोलीस चौकीच्या हद्दीप्रमाणे) असेल. दक्षिणेस औताडेवाडी तलाव ते धर्मावत पेट्रोल पंपापर्यंत, उत्तरेस शनी मंदीर ते मंतरवाडी चौकापर्यंतची उजवी बाजू असणार आहे.
  • आंबेगाव पोलीस ठाण्यासाठी पूर्वेस कात्रज चौक ते कात्रज जुन्या बोगद्यासह, राजगड पोलीस स्टेशन हद्दीपर्यंत आणि पुढे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत असेल.
  • बाणेर पोलीस ठाण्याची हद्द पूर्वेस संपूर्ण पाषाण तलाव ते पुढे सांगवी पोलीस ठाणे हद्दीपर्यंत. पश्चिमेस हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीपर्यंत, उत्तरेस मुळा नदी वरील वाकड पुलापुढे चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत असेल.
  • वाघोली पोलीस ठाण्यासाठी पूर्वेस कोलवडी, पेरणे ते लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत. उत्तरेस लोणीकंद-तुळापूर गावाची महसुली हद्द ते इंद्रायणी नदी पात्रासह आळंदी पोलीस ठाण्यापर्यंत हद्दीपर्यंत असेल.
  • नांदेडसिटी पोलीस ठाण्यासाठी पूर्वेस धायरी गाव ते पश्चिमेस दळवीवाडी ते खडकवासला पर्यंत असणार आहे.
  • फुरसुंगी पोलीस ठाण्यासाठी पूर्वेस फुरसुंगी आणि कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनची हद्दपर्यंत, दक्षिणेस औताडवाडी डोंगरमाथा पासून सरळ सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत असेल.
  • खराडी पोलीस ठाण्यासाठी पूर्वेस मुठा नदीचे पात्र ते खराडी गावचा महसुली भाग, उत्तरेस खराडी बायपास चौक ते जुना जकात नाका भागापर्यंत असणार आहे.