शिरूर : बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वंस राजकुमार सिंग या सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मांडवगण फराटा येथे घडली. खेळण्या-बागडण्याच्या वयात झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली.
मांडवगण फराटा गावातील गोकुळनगर-दगडवाडी रस्ता येथील संदीप अशोक घाडगे यांच्या मालकीच्या वाघेश्वर गूळ उद्योग येथे गुऱ्हाळवर राजकुमार नथू सिंग हे कुटुंबासमवेत कामाला आहेत. राजकुमार सिंग आणि त्यांची पत्नी रेखा यांच्यात शुक्रवारी घरगुती कारणावरून किरकोळ वाद सुरू होता. रात्रीच्या वेळी आई पुढे चालत असताना मागून त्यांचा मुलगा वंस हा जात होता. मागे येणाऱ्या मुलाचा जोराने रडण्याचा आवाज आल्यानंतर आईने वळून पाहिले असता बिबट्याने मुलावर झडप घातली होती. आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्यावर हल्ला करत बिबट्याने त्याला ऊसाच्या शेतात नेले. त्यानंतर आईने मोठ्याने आरडाओरडा केला. त्यानंतर तेथे आलेल्या गुऱ्हाळ कामगार, ऊसतोड कामगार आणि जमलेल्या नागरिकांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. बिबट्याने हल्ला केल्याची माहिती पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली. रात्री उशिरा चिमुकल्याला गंभीर जखमी अवस्थेत शोधण्यात यश आले. उपचारांसाठी त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा – सावध ऐका पुढल्या हाका…
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. हल्ला केलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तत्काळ पिंजरे आणि सापळा कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १२ पिंजरे आणि नऊ सापळा कॅमेरा लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
हेही वाचा – कात्रज भागात फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल चोरणारे गजाआड
भीमा नदीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांची मोठी संख्या आहे. हे लक्षात घेता, शेतातील आणि लगतच्या प्रत्येक घराभोवती भरपूर प्रकाश दिवे लावणे, घराभोवतीचे आणि शेताजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूचे संपूर्ण गवत काढून टाकणे, दिवस उगवण्यापूर्वी आणि मावळल्यानंतर शक्यतो घराबाहेर न पडणे, अपरिहार्यता असल्यास सोबत टॉर्च आणि मोठी काठी बाळगणे या सूचनांचे ग्रामस्थांनी गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन जुन्नर वन विभागाकडून करण्यात आले आहे.
© The Indian Express (P) Ltd