पुणे : लोहमार्गावरून धावणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेवर गंमत म्हणून फेकलेल्या दगडाचा घाव एका तेरा वर्षे वयाच्या मुलाच्या जिव्हारी लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. पण, रेल्वे प्रशासनाच्या तात्काळ हालचालींमुळे उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. आरोपी पाच तासांत पकडण्यात आला. गाडीवर दगड फेकणाराही एक अल्पवयीन मुलगाच होता.
रेल्वेच्या पुणे विभागातून जात असलेल्या चेन्नई सेंट्रल-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाडीत ही घटना घडली. या गाडीमधून प्रवास करणारा बालाजी नावाचा तेरा वर्षे वयाचा मुलगा त्यात जखमी झाला आहे. रेल्वेने पुणे स्थानक सोडल्यानंतर ती मुंबईच्या दिशेने निघाली होती. स्थानक सोडल्यानंतर पंधरा मिनिटांच्या अंतरावर रेल्वेच्या बाहेरून अचानक एक दगड फिरकावला गेला. तो खिडकीजवळ बसलेल्या बालाजीच्या डोक्यावर लागला. काही क्षणातच बालाजीच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. प्रवासात बालाजीसोबत असलेली त्याची आई या प्रकाराने घाबरून गेली. धावत्या गाडीत काय करावे, हे सूचत नव्हते. मात्र, तितक्यात गाडीतील आनंद नावाचा एक प्रवासी पुढे झाला. त्याने तातडीने रेल्वे मदत क्रमांक १३९ वर संपर्क साधला.
हेही वाचा – पुणे : नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या कबुतराला जीवदान
रेल्वेच्या बाहेरून फेकण्यात आलेल्या दगडामुळे एक लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती आनंद यांनी रेल्वे मदत कक्षाला दिली. तोवर गाडी लोणावळा स्थानकापासून काही अंतरावर होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाली करून ही माहिती लोणावळा स्थानकात दिली. तेथे बालाजीवर प्रथमोपचार करण्यात आले. गाडी मुंबईला पोहोचल्यानंतर तेथे रेल्वेचे वैद्यकीय पथक बालाजीसाठी तयार ठेवण्यात आले होते. त्यांनी बालाजीवर उपचार केले. या घटनेत त्याच्या डोक्याला आणि डोळ्याजवळ गंभीर इजा झाली होती.
हेही वाचा – पुणे : जी-२० परिषदेनिमित्त देशभरात ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ जागृती मोहीम
बालाजीला वैद्यकीय मदत पुरविण्याबरोबरच दुसरीकडे आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, दगड फेकण्यात आलेल्या भागात रेल्वे पोलिसांनी माहिती घेतली. परिसर पिंजून काढला आणि घटनेनंतर अवघ्या पाच तासांतच आरोपीला शोधून काढले. मात्र, दगड भिरकावणारा आरोपीच अल्पवयीन होता. केवळ गंमत म्हणून त्याने रेल्वेच्या दिशेने दगड फेकला असल्याचेही त्याच्याकडील चौकशीत उघड झाले. या आरोपीला बाल गुन्हेगारी कायद्यानुसार ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली.