अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही अधिकृत नोंदणीकृत संघटना नसल्याचा दावा करीत या संघटनेमार्फत आयोजित केलेल्या प्रकाशकांच्या परिषदेवर मराठी प्रकाशक परिषदेने बहिष्कार टाकला. एवढेच नव्हे तर, या परिषदेच्या उद्घाटनासाठी आलेले नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक एम. ए. सिकंदर यांनी दुपारी या परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदूर, कार्याध्यक्ष अरुण जाखडे, कार्यवाह अरुण पारगावकर आणि खजिनदार अरिवद पाटकर यांनी परिषदेचे सभासद असलेल्या प्रकाशकांना पत्र पाठवून या परिषदेसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली होती. आपल्याला यापूर्वी मिळालेले पत्र हे अधिकृत मराठी प्रकाशन संस्थेचे नसल्याने या कार्यक्रमास जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. अनैतिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या एका प्रकाशकाने दोन-चार प्रकाशक आणि मुद्रितशोधकांना हाताशी धरून ही परिषद आयोजित केली असल्याचा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे.
अतीव कष्टाने आणि अनेक संकटांचा सामना करून उभ्या राहिलेल्या प्रकाशनसंस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक प्रकाशक फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील प्रकाशकांचा आपल्यालाच कसा पाठिंबा आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, याकडे या पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. ज्यांनी कॉपीराईट कायदा आणि पायरसीचे नियम अनेकदा मोडण्याचा प्रयत्न केला तेच आता या विषयावर परिसंवाद आयोजित करीत आहेत हाच विनोद असल्याची टिप्पणी अरुण जाखडे यांनी केली.