महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या पद्धतीने आयुक्तांचा अपमान केला, तो प्रकार निषेधार्ह असून त्या पक्षाचे नगरसेवक जोपर्यंत आयुक्तांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्य सभेत तसेच कोणत्याही बैठकीत उपस्थित न राहण्याचा निर्णय महापालिका अधिकाऱ्यांनी मंगळवारी घेतला. मनसेने याबाबत प्रतिक्रिया दिली असून माफीचा प्रश्नच येत नाही आणि तडजोडही होणार नाही, असे म्हटले आहे.
मनसेच्या नगरसेविकांनी मंगळवारी मुख्य सभेत आयुक्त महेश पाठक यांच्या निषेधार्थ घोषणा देत त्यांना बांगडय़ाचा आहेर दिला. या प्रकारानंतर सर्व अधिकारी तातडीने सभा सोडून निघून गेले. त्यानंतर सभा सुरू असताना अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक सभागृहाबाहेर झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. मुख्य सभेतील प्रकाराच्या निषेधार्थ सर्व अधिकारी बुधवारी (२४ जुलै) सकाळी काळ्या फिती लावून महापालिका भवनासमोर एक तास थांबणार आहेत. या निषेध आंदोलनाला चतुर्थ श्रेणी संघटना, लिपीक संघटना, डॉक्टर्स संघटना तसेच अभियंता संघाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती बुधवारी आणखी वाढू शकेल, असा अंदाज आहे.
मनसेचे नगरसेवक जोपर्यंत आयुक्तांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मुख्य सभेत वा कोणत्याही बैठकीत उपस्थित न राहण्याचाही निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ज्या सभेत आयुक्तांना अशाप्रकारे अपमानास्पद वागणूक दिली जाते, ज्या सभेत प्रशासनातील सर्वोच्च अधिकाऱ्याचा अपमान केला जातो त्या सभेत आम्ही जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
माफीचा प्रश्नच येत नाही- मोरे
मनसेचे गटनेता वसंत मोरे यांनी अधिकाऱ्यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, माफीचा प्रश्नच येत नाही. नाहीतरी अधिकारी मुख्य सभेत येऊन काय काम करतात, त्यापेक्षा रजा घेऊन त्यांनी कुठेतरी सहलीला जावे. अधिकाऱ्यांना काहीतरी निमित्त हवे होते, म्हणून ते असा निर्णय घेत आहेत. उलट, आता आम्ही कायद्यानुसार या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करता येईल त्याबाबत माहिती घेत आहोत. अधिकारी योग्य प्रकारे काम करणार नसतील, तर या पुढची पायरी आम्हाला गाठावी लागेल.

Story img Loader