पुणे अग्निशामक दलाने बारा कोटीची ऑर्डर देऊन घेतलेली ४२ मीटर उंच शिडीची ‘ब्रान्टो’ मोटार ही सेवेत दाखल होण्याअगोदर नादुरुस्त असल्यामुळे दोन आठवडय़ांपासून वाकड येथील एका शोरूममध्ये ठेवण्यात आली आहे.  मुंबईहून पुण्याला घेऊन येताना घाटामध्ये मोटारीची ‘क्लच प्लेट’ तुटल्यामुळे तिला टोचन लावून पुण्यात आणले आहे.
पुणे अग्निशामक दलाकडे सध्या उंच शिडीच्या दोन मोटारी आहेत. शहराचे वाढते स्वरूप पाहता पुण्यात उंच शिडीच्या आणखी मोटारी विकत घेण्याचा निर्णय झाला. यातील ४२ मीटर उंच शिडीची ब्रान्टो मोटार ही स्वीडनवरून तर ५६ मीटर उंचीची दुसरी मोटार जर्मनीवरून घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार अग्निशामक दलाचे एक पथक जर्मनीला जाऊन एका मोटारीची पाहणी करून आले. स्वीडनवरून ४२ मीटर उंच शिडीची ही मोटार मुंबईत दाखल झाली. ती घेऊन येण्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ातील शनिवारी पुण्यातून अग्निशामक दलाचा एक अधिकारी व चालक मुंबईला गेले. या ठिकाणाहून ही मोटार घेऊन येत असताना घाटात त्या मोटारीची ‘क्लच प्लेट’ तुटली.  त्यामुळे या ठिकाणाहून या मोटारीला टोचन लावून पुण्यात आणण्यात आले. तिला वाकड येथील एका कंपनीच्या शोरूमध्ये ठेवण्यात आले आहे. या मोटारीची किंमत साधारण बारा कोटीच्या जवळ आहे, या मोटारीचे अद्याप पैसे दिलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख शरद रणपिसे यांनी सांगितले की, ‘‘आमच्याकडे अद्याप मोटार दाखल झालेली नाही. त्यामुळे ती दुरुस्त किंवा ना दुरुस्त आहे. या विषयी काही सांगू शकत नाही. २०१२ मध्ये ४२ मीटर उंच शिडीच्या ब्रान्टोचा प्रस्ताव  पाठविलेला आहे. करारानुसार ही मोटार आम्हाला आणून देण्याची जबाबदारी ही कंपनीची आहे. सध्या अग्निशामक दलाकडे ४२ आणि ७० मीटर उंच शिडीचे दोन ब्रान्टो आहेत.’’