लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ब्राझीलमध्ये उसाची उपलब्धता चांगली असल्यामुळे गाळप हंगाम महिनाभर लांबण्याचा अंदाज आहे. यंदा ब्राझीलचे साखर उत्पादन ४२१ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. एल निनोमुळे जगभरातील अन्य देशांत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक साखर बाजाराला ब्राझीलमधील उत्पादनामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने (आयएसओ) दिलेल्या माहितीनुसार यंदा ब्राझीलमध्ये उसाची उपलब्धता चांगली आहे. साखर उताराही चांगला मिळत आहे. सामान्यपणे नोव्हेंबर महिन्यात ब्राझीलमधील गाळप हंगाम संपतो. यंदा तो एक महिना जास्त म्हणजे डिसेंबरअखेर चालण्याचा अंदाज आहे. मागील दोन वर्षे ब्राझील दुष्काळाच्या समस्येला सामोरे जात होता. त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होत होता. मागील वर्षी ब्राझीलचे साखर उत्पादन ३८० लाख टनांवर थांबले होते. यंदा ४२०. ६० लाख टनांहून जास्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-…तर फटाके स्टॉलवर कारवाई; महापालिकेचा इशारा

जागतिक साखर बाजारात तुटीची शक्यता जागतिक साखर संघटनेने व्यक्त केली आहे. यंदा जागतिक साखर बाजारात ४०.३६ लाख टन साखरेचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. जगभरात दर वर्षी सुमारे १६६८.९७० लाख टन साखरेचा वापर होतो. यंदा एल निनोमुळे आशियाई देशात साखर उत्पादनात घटीचा अंदाज आहे. थायलंडमध्ये दर वर्षी सुमारे ११० लाख टन उत्पादन होते. यंदा उत्पादन ८० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. एल निनोसह अन्य कारणांमुळे भारत, चीन, थायलंड, अमेरिका आणि युरोपीय देशांत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज जागतिक साखर संघटनेने व्यक्त केला आहे.

साखर उत्पादन करणाऱ्या जगातील आघाडीच्या दहापैकी सहा देशांतील साखर उत्पादनाला एल निनोचा फटका बसणार आहे. ब्राझीलमधील साखर उत्पादनाचे आकडे दिलासादायक आहेत. यंदा ब्राझीलचे साखर उत्पादन ४२१ लाख टनांवर जाण्याचा अंदाज जागतिक साखर संघटनेने (आयएसओ) व्यक्त केला आहे.

Story img Loader