सत्य मांडण्यामध्ये भावनिकता आणि तत्त्वज्ञानाची चौकट हे अडसर ठरत आहेत. यामध्ये अडकून पडल्यामुळे खरा इतिहास जनतेसमोर आला नाही, असे मत विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
साहित्यिक-कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित १५ व्या साहित्यिक-कलावंत संमेलनामध्ये ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रा. शेषराव मोरे आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना वाग्यज्ञे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संमेलनाचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे या वेळी उपस्थित होते.
प्रा. मोरे म्हणाले, जनतेला काय वाटेल या भावनेमध्ये अडकून पडल्याने सत्याकडे डोळेझाक केली गेली. मार्क्सवाद, आंबेडकरवाद, गांधीवाद, समाजवाद, हिंदूुत्ववाद आणि देशीवाद अशा वादाचा अभ्यास करणाऱ्यांनी तत्त्वज्ञानाच्या चौकटीपलीकडचे काही सांगणार नाही या भूमिकेतून सत्याची मांडणी केली नाही. प्रत्येक लेखक समाजाला काही सांगण्यासाठी लेखन करीत असतो. त्याचवेळी परस्पर विसंगत गोष्टी तो मनात बाळगत असतो. विसंगती ही भावनेतून येते आणि विचारवंत समाजाच्या भावनेला धक्का लावू इच्छित नाही. सावरकर हिंदूुत्वनिष्ठ की विज्ञाननिष्ठ, ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिले की फाळणी केली, काश्मीरचे विलीनीकरण भारतात व्हावे की पाकिस्तानात अशा राष्ट्रीय विसंगती असलेल्या प्रश्नांसंदर्भात सत्य सांगणारे लेखन मी केले. सत्य हे अप्रिय असते. अशा अप्रिय लेखनाचा गौरव झाला याचा आनंद वाटतो.
नागराज मंजुळे म्हणाले,  कवितेप्रमाणेच वैयक्तिक अभिव्यक्तीच्या हट्टापोटी मी चित्रपट करतो. खूप काही बोलायचे असते ते मी चित्रपटातूनच बोलतो. हे बोलणे लोकांना आवडते आणि त्याचे कौतुकही होते याचा आनंद आहे. अशा पुरस्काराच्या माध्यमातून शाबासकीची थाप आणि नवे काम करण्याची ऊर्जा मिळते.
सबनीस म्हणाले, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय माणसांचा विटाळ करून चालणार नाही. साहित्यिक-कलावंतांनी सत्तेपुढे लाचार होण्याची आवश्यकता नाही. सत्तेला शरण जाण्यापेक्षा सत्याला शरण गेले पाहिजे. रामदास फुटाणे यांनी कविता सादर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा