पुणे : स्तनपान हे बाळासाठीच नव्हे तर मातेसाठीही आवश्यक असते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. जगात मागील दशकभरात स्तनपानाचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढून ४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत हे प्रमाण ७० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी स्तनपानाचे फायदे मांडले आहेत.

खराडीतील मणिपाल हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ऋषाली जाधव म्हणाल्या की, बाळाच्या जन्मानंतर स्तनपान हा नैसर्गिक आणि अतिशय आवश्यक घटक आहे. नवजात अर्भकांना आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्ये त्यात असतात. त्यामुळे ती पुढील आयुष्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहतात. पहिली सहा महिने बाळाला मातेचे दूध हाच आहार असतो. त्यात बाळाची प्रतिकारशक्ती वाढविणारी पोषणमूल्येही असतात. मातेचे दूध पिणाऱ्या मुलांचा मेंदू अधिक विकसित झालेला आढळतो. स्तनपान केवळ बाळांसाठी नव्हे तर मातांसाठी गरजेचे आहे. त्यातून प्रसूतिपश्चात लवकर बरे होण्यास त्यांना मदत होते. याचबरोबर बाळासोबत दृढ नाते तयार होते. तसेच, महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

हेही वाचा – महाराष्ट्राचे जीएसटीत योगदान किती? मुनगंटीवारांनी दिलं स्पष्ट उत्तर

याविषयी सह्याद्री हॉस्पिटल्समधील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप सूर्यवंशी म्हणाले की, स्तनपान म्हणजे निसर्गाने अर्भकांना दिलेली एक परिपूर्ण देणगी आहे. लहान बाळांमध्ये वाढीसाठी अत्यावश्यक असणारी पोषणमूल्ये देणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, श्वसनाच्या आणि पोटाच्या विकारांपासून बाळाचे संरक्षण करणे, असे फायदे त्यातून मिळतात. बाळाच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठीसुद्धा स्तनपान गरजेचे आहे. स्तनपानामुळे बाळांना रक्तपेशीचा कर्करोग, टाईप-एक मधुमेह आणि नंतरच्या आयुष्यात उच्च रक्तदाब यासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोकाही कमी होतो. तसेच स्तनपान करवणे हे अगदी सोयीचे, सहज उपलब्ध असणारे आणि मोफत आहे. स्तनपान करते वेळी होणारा आईचा स्पर्श हा आई आणि बाळामधील भावनिक नाते दृढ करण्यासाठी अतिशय गरजेचा ठरतो.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड : अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे विरोधी पक्षाचे नेते नजरकैदेत

स्तनपान वाढविण्यासाठी काय करावे?

  • नोकरदार महिलांना स्तनपानासाठी वेळ
  • कामाच्या ठिकाणी स्तनपानासाठी स्वतंत्र कक्ष
  • मातेला बाळाच्या संगोपनासाठी किमान १८ आठवडे रजा
  • सरकारी धोरणात स्तनपानसंबंधी कार्यक्रमांचा समावेश करणे
  • स्तनपानाबद्दल समाजात जनजागृती करणे

Story img Loader