पुणे : दाखल देण्यासाठी ४०० रुपयांची लाच घेणाऱ्या सेतू कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या संगणक ऑपरेटर दोन महिलांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. दोघींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी वंदना दिनेश शिंदे (वय ५०), जयश्री रोहिदास पवार (वय ४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. तक्रारदाराने हवेली अप्पर तहसील कार्यालयातील सेतू कार्यालायत भूमीहिन दाखल मिळवण्यासाठी अर्ज केला होता. सेतू कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या संगणक ऑपरेटर वंदना शिंदे आणि जयश्री पवार यांनी दाखल देण्यासाठी त्यांच्याकडे पाचशे रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत चारशे रुपये देण्याचे मान्य करुन तक्रारदाराने ‘एसीबी’कडे तक्रार दिली. त्यानंतर सेतू कार्यालयात शुक्रवारी दुपारी सापळा लावून दोघींना तक्रारदाराकडून चारशे रुपयांची लाच घेताना पकडले. दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत.

Story img Loader