लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: चोरलेली मोटार परत मिळवून देण्यासाठी एकाकडून २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.

शशिकांत नारायण पवार असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. उपनिरीक्षक पवार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील अभिरुची चौकीत नियुक्तीस आहेत. तक्रारदाराच्या मोटारीवरील चालक मोटार घेऊन त्याच्या गावी पसार झाला होता. याबाबत तक्रारदाराने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करुन मोटार परत मिळवून देतो, असे सांगून अभिरुची पोलीस चौकीतील उपनिरीक्षक पवार यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली.

आणखी वाचा- पुणे: लूटमार प्रकरणात पाच वर्षे गुंगारा देणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले

तक्रारदाराने तडजोडीत २० हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर अभिरुची पोलीस चौकीच्या आवारात सापळा लावून तक्रारदाराकडून २० हजारांची लाच घेणारे उपनिरीक्षक शशिकांत पवार यांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीहरी पाटील, उपअधीक्षक विजयमाला पवार यांनी ही कारवाई केली.

Story img Loader