लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या नगररचना विभागातील सर्व्हेअरला सेवानिलंबित करून विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले.
संदीप फकिरा लबडे (वय ४८) असे या सर्व्हेअरचे नाव आहे. ३ ऑगस्टला पालिका मुख्यालयात ही कारवाई झाली होती. ३८ वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या कंपनीचे काम करून देण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी आरोपीने केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यालयात सापळा रचून पैसे घेताना आरोपीला अटक केली.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर, आयुक्त राजेश पाटील यांनी लबडेला अटकेच्या दिवसापासून सेवानिलंबित केले आहे. त्याचप्रमाणे, विभागीय चौकशीचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.