पिंपरी : मामुर्डी आणि सांगवडे गावाला जोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने पवना नदी पात्रावर पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३६ कोटी ६६ लाख रुपये खर्च येणार असून कामाची मुदत एक वर्ष आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराच्या सीमेवर असलेल्या मामुर्डी व किवळे भागातून हिंजवडी माहिती व तंत्रज्ञाननगरीकडे जाण्यासाठी जवळचा पूल नसल्याने नागरिकांना वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वेळ व प्रवास खर्च अधिक होत आहे. सध्या असलेला लोखंडी पूल धोकादायक झाला आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या स्थापत्य मुख्यालयाच्या वतीने पुलाच्या कामासाठी ३७ कोटी २५ लाख ९१ हजार ३६६ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी चार ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी ए. आर. कन्स्ट्रक्शन व टी ॲण्ड टी इन्फा लिमिटेडची ३६ कोटी ६६ लाख रुपये खर्चाची कमी दराची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. बारा महिन्यांत पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या पुलामुळे मामुर्डी व सांगवडे तसेच, हिंजवडीकडे ये-जा करणे सुलभ होणार आहे. सर्व प्रकाराच्या वाहनांना पुलावरून ये-जा करता येणार आहे.

दरम्यान, पिंपरी व पिंपळे सौदागर या गावांना जोडणाऱ्या पवना नदीवरील समांतर पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. थेरगाव येथे पवना नदीवर फुलपाखरू प्रकारातील आणि स्टील गर्डरमधील पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. पुलाला जोडणार्‍या जोडरस्त्याचे काम अपूर्ण असल्याने हा पूल अद्याप सुरू होऊ शकलेला नाही.