पुणे : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित हे सेवानिवृत्त झाले आहेत. आता नितीन करीर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नागपूर आणि पुणे मेट्रोची धुरा महामेट्रोकडे आहे. महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा दीक्षित यांच्याकडे २०१८ पासून होती. दीक्षित यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे अखेर ते सेवानिवृत्त झाले आहेत.
आता महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार नितीन करीर यांच्याकडे देण्यात आला आहे. करीर हे अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. करीर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोमवारपासून तातडीने सोपवण्यात आला आहे. सरकाकडून पुढील आदेश येईपर्यंत करीर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असेल. याबाबतचा आदेश राज्य सरकारचे उपसचिव विजय चौधरी यांनी काढला आहे.