सोलापूर जिल्ह्याला जोडणारा ब्रिटिशकालीन डिकसळ पूलाचा खालील भाग खचल्याने वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. तब्बल ४५ वर्षानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे उजनी धरणकाठ परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिकांचा पुणे जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे भिगवण बाजारपेठेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
हेही वाचा- पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेने निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजारातील धान्याची आवक पन्नास टक्क्यांनी कमी झाल्यामुळे त्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यामध्ये या पुलाचा खालील भाग कोसळून भगदाड पडल्याचे मच्छीमारांच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने या पुलावरची वाहतूक तात्काळ बंद केली. परंतु गेली ४५ वर्षे सुरू असलेली ही वाहतूक अचानक बंद झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये येण्यासाठी ५० ते ६० किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागत आहे.
हेही वाचा- पुण्यात खराडीमध्ये बांधकाम प्रकल्पात सुरुंगाचा स्फोट, मजुराचा मृत्यू, एक जखमी
पुणे -सोलापूर लोहमार्गासाठी ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी हा पूल बांधला. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर हा लोहमार्ग बदलला. मात्र, भीमा नदीवर असणाऱ्या या पुलावरून आणि जुन्या लोहमार्गाच्या रस्त्यावरून कोंढार चिंचोली, टाकळी ,केतुर, वाशिंबे ,कात्रज, खादगाव ,गवळवाडी, रामवाडी, गुलमोहरवाडी या गावांनी वाहतूक सुरू ठेवली. पुणे जिल्ह्याला जोडणारा हा एकमेव मार्ग तेथे असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाला. साखर कारखान्यांना लागणारा ऊस त्याचबरोबर सातत्याने होणारा वाळू उपसा यामुळे या पुलावरचा ताण सतत वाढत गेला. या फुलाचे आयुष्यमान संपल्याचे ब्रिटिश सरकारने २० वर्षांपूर्वी आपल्या सरकारला कळवल्याचे समजते. मात्र, तरीही हा पूल वाहतुकीसाठी सुरूच होता. आता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
हेही वाचा- “वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचक विधान
वैद्यकीय सेवेसाठी या परिसरातील नागरिक पुणे जिल्ह्यातील दवाखान्यामध्ये येतात. मात्र, आता तेथील रुग्णांची मोठी गैरसोय झाली आहे. शेतमाल बाजारपेठेत आणण्यासाठी या पुलाचा वापर होत होता. करमाळा तालुक्यातील मोठी आवक भिगवणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातत्याने होते. मात्र, आता वाहतुकीलाच अटकाव बसल्यामुळे आवक ५० टक्क्यांहून कमी होत असल्याचा फटका बाजार समितीच्या व व्यापाऱ्यांच्या उलाढालीवर झाला आहे. नवीन पुलाची त्वरित उभारणी करावी, अशी मागणी या परिसरातून होत आहे.