पुणे : ‘संपूर्ण देशाचे रक्षक असलेल्या मराठ्यांनी अखंड हिदुस्तानाची संकल्पना सर्वप्रथम मांडली. मराठ्यांच्या राजकारणात लवचीकता होती. ते कर्तृत्ववान आणि जाणते राज्यकर्ते होते. आताचा भारत शाबूत ठेवण्यात मराठ्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, ब्रिटिश इतिहासकारांनी खोडसाळपणे मराठ्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केले. इतिहासातील त्यांच्या कार्यांच्या नोंदी टाळल्या. त्यामुळे मराठ्यांचा पहिल्या टप्प्यातील इतिहास दुर्लक्षित राहिला,’ असे मत ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे यांनी सोमवारी व्यक्त केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेमध्ये ‘बाजीराव पेशवे स्मृती व्याख्यान पुष्प गुंफताना ‘मराठ्यांचे उपेक्षित साम्राज्य’ या विषयावर डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय मराठ्यांचा लुटारू असा उल्लेख केला. त्यांनी मराठ्यांच्या कर्तृत्वाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रजपूत आणि मोघलांना मोठे केले. मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा ब्रिटिशांनी पुसून टाकल्या. दफ्तरे जाळली. गड, किल्ल्यांना सुरुंग लावून ते पाडले. मात्र, नंतरच्या काळात न्या. महादेव गोविंद रानडे, वि. का. राजवाडे यांनी मराठ्यांचा पराक्रमी इतिहास मांडला. ब्रिटिश इथे आले नसते, तर या संपूर्ण देशावर मराठ्यांचे राज्य असते, असे काही प्रामाणिक ब्रिटिश लेखकांनी लिहून ठेवले असल्याचेही भारतीय इतिहासकारांनी प्रकाशात आणले. भारतीय इतिहासात बहुतेक राज्यकर्ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. मात्र, एकमेव मराठे असे होते, की ते दक्षिणेकडे उत्तरेकडून गेले. त्यांनी अटकेपार झेंडा रोवला.’
‘पानिपतचा पराभवही मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. त्यानंतर अब्दाली कधीच भारतात येऊ शकला नाही. पानिपतमध्ये मराठे जिंकले असते, तर तेव्हाच देशावर राज्य केले असते. मराठे नसते, तर ब्रिटिशांनी आधीच दिल्लीत तळ ठोकला असता. त्यांना नाईलाजास्तव कलकत्ता येथे मुख्यालय करावे लागले. ते कलकत्तामार्गे दिल्लीत येत होते. ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला. त्यामुळे ब्रिटिशांनी मोघलांकडून नव्हे, तर मराठ्यांकडून दिल्ली घेतली,’ याकडे मोरे यांनी लक्ष वेधले.