पुणे : एरंडवणे भागातील घर नावावर करण्यासाठी भाऊ आणि बहिणीने सख्ख्या भावाचा कालव्यात ढकलून खून केल्याची घटना पाच वर्षांपूर्वी घडली. गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपासात खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज चंद्रकांत दिघे (वय २३, रा. भालेकर चाळ, एरंडवणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सुहास दिघे, आश्विनी अडसूळ, प्रशांत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महेश बाबुराव धनावडे (वय ३७, रा. देशमुखवाडी, शिवणे) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
फुरसुंगी गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टच्या आवाराच्या परिसरातील कालव्यात १८ मार्च २०१७ रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. त्या वेळी डेक्कन पोलीस ठाण्यात पंकज दिघे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दिघे यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली होती.
पंकज यांचे एरंडवणे भागातील एका चाळीत घर आहे. भाऊ सुहास दिघे आणि बहिण अश्विनी अडसूळ पंकजला घर नावावर करण्यासाठी त्रास देत होते. आरोपी सुहास आणि अश्विनी यांनी आरोपी प्रशांत आणि महेश धनावडे यांच्याशी संगनमत करुन खुनाचा कट रचला. १४ मार्च २०१७ रोजी पंकज यांना मारहाण केली. मोटारीतून त्यांचे अपहरण करण्यात आले. पंकज यांना मारहाण करुन हडपसर परिसरातील कालव्यात ढकलून आरोपी पसार झाले. त्यानंतर आरोपी सुहासने भाऊ पंकज बेपत्ता झाल्याची तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात दिली होती, असे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले. पंकज यांचा भाऊ सुहास आणि बहीण अश्विनी यांनी साथीदारांशी संगमनत करुन खून केल्याची माहिती तपास पथकाला मिळाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा गुन्हा उघड झाला.