पुणे : वैमनस्यातून टोळक्याने भावंडांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना धानोरीतील मुंजाबा वस्तीत घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

पंकज कुमार आणि साहू कुमार (दोघेही रा. मुंजाबा वस्ती, धानाेरी) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश राधेश्याम गुप्ता (वय ४०, रा. धानोरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार नितीन गुप्ता (वय २५), आकाश गुप्ता (वय १९) यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल कुमार गौतम (वय २३ रा. मुंजाबावस्ती ) यांनी विश्रांतवाडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजकुमार आणि आरोपी गुप्ता यांच्यात काही दिवसांपूर्वी वादविवाद झाले होते. त्याचा राग गुप्ता कुटुंबीयांमध्ये होता. शुक्रवारी (२५ एप्रिल) रात्री आरोपी गुप्ता यांनी पंकजवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले, त्या वेळी पंकजचा भाऊ साहूने भांडणात मध्यस्थी केली. टोळक्याने त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पंकजकुमार आणि त्याचा भाऊ साहू हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे तपास करत आहेत.