शहरात सुरू होत असलेल्या बीआरटी प्रकल्पाचा कोणताही भार पीएमपी सेवेवर येणार नाही याची दक्षता महापालिका आणि पीएमपीने घ्यावी. तसेच, बीआरटीच्या खर्चामुळे सर्वसामान्य पीएमपी प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडेही लक्ष दिले जावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
विश्रांतवाडी मार्गावरील बीआरटी सेवा रविवारपासून सुरू होत असून या मार्गाची व सेवेची माहिती प्रवाशांना होण्यासाठी या मार्गावर एक महिना मोफत सेवा दिली जाणार आहे. या मार्गावर तसेच या मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर प्रवाशांसाठी सातत्याने गाडय़ा उपलब्ध असतील याचेही नियोजन करण्यात आले आहे. बीआरटीची ही नवीन सेवा सुरू होत असल्यामुळे त्या सेवेचा कोणताही भार पीएमपीवर व पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांवर पडणार नाही, तसेच त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, त्यांच्यासाठी अन्य मार्गावर ज्या गाडय़ा आहेत त्यांच्या संख्येत घट होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी माागणी पीएमपी प्रवासी मंचने केली आहे. या मागणीचे निवेदनही प्रवासी मंचचे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी प्रशासनाला दिले आहे.
बीआरटी प्रकल्पाचा सर्व हिशेब स्वतंत्र ठेवावा तसेच या प्रकल्पाचा संपूर्ण आर्थिक बोजा महापालिका आणि राज्य शासनाने उचलावा. या प्रकल्पाचा कोणताही आर्थिक भार पीएमपीवर पर्यायाने प्रवाशांवर टाकू नये, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. बीआरटी प्रकल्पाच्या सुरुवातीपासून ते पुढील संचलनाचे सर्व हिशेब पूर्णत: वेगळे ठेवावेत. बीआरटीसाठी अत्याधुनिक थांबे, जाहिरात आदी अनेक खर्च केले जाणार असून हे सर्व खर्च स्वतंत्र बँक खात्यातून करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader