मोठय़ा रस्त्यांचा वापर करण्याची सवय असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना बीआरटीमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांवर वावरताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महामार्गावर चौकाचौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दररोज दिसू लागले आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग सुरू होईपर्यंत दोन्ही बाजूला असलेले सिमेंटचे कठडे काढून टाकण्याची मागणी काँग्रेसचे नेते आझम पानसरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा, ते कठडे तोडून तो मार्ग नागरिकांना खुला करू, असा इशाराही दिला आहे.
पिंपरी पालिकेच्या वतीने नेहरू अभियानाअंतर्गत सार्वजनिक वाहतुकीकरिता बीआरटी मार्ग तयार करण्यात आले आहेत. तथापि, अधिकृतपणे त्या मार्गाचा वापर झालेला नाही. मात्र, बीआरटी मार्गामुळे शहरातील रस्ते बरेच अरुंद झाले असून रस्त्यांवर कोंडी असल्याचे जागोजागी दिसू लागले आहे. त्यातून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या संदर्भात, अनेकांनी आयुक्तांना निवेदने दिली असून आंदोलनेही केली आहेत. पानसरे यांनी यासंदर्भात आयुक्त राजीव जाधव यांना दिलेल्या निवेदनात बीआरटी मार्ग पूर्णपणे सुरू होईपर्यंत तसेच पदपथांची रुंदी कमी करेपर्यंत हे बंद केलेल्या मार्ग खुले करावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा ते कठडे तोडून संबंधित मार्ग नागरिकांसाठी खुले करू, असा इशाराही दिला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले पदपथ कमी न करता बीआरटी मार्गाचे काम करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध असणारे रस्ते अरुंद झाले. परिणामी, जागोजागी कोंडी होऊ लागली. नागरिकांना पायी चालणे अवघड झाले. त्यात प्रशासनाने बीआरटी मार्ग सिमेंटचे कठडे लावून दोन्ही बाजूने बंद करून ठेवले आहेत. ते मार्ग सुरू केल्यास काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळू शकेल, असे पानसरे यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा