बीआरटी योजना पाहणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत खुद्द महापौरांनीच अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली असून निष्काळजी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बीआरटी मार्गात गुरुवारी जो अपघात घडला, त्याला प्रशासनाचा भोंगळपणा आणि निष्क्रिय कारभारच जबाबदार असल्याचे महापौर चंचला कोद्रे यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे. बीआरटी मार्गात अन्य वाहने येऊ नयेत यासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्याबाबत महापौरांनी आयुक्तांना सूचना केल्या होत्या. ही बाब लिखित स्वरूपात ११ ऑक्टोबर रोजी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. तसे पत्रही महापौरांनी दिले होते. तरीही त्याबाबत कार्यवाही झाली नाही.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांचे आदेश गांभीर्याने घेतले नाहीत. त्यामुळेच बीआरटी मार्ग ओलांडताना हजारो शालेय विद्यार्थी, महिला आणि नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. बीआरटी मार्गात ट्रॅफिक वॉर्डन नसल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो, हेही या पत्रात नमूद करण्यात आले होते.
बीआरटी मार्गात ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्यासाठी महापौर निधीतून महापौरांनी तातडीने पंचवीस लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. त्याबाबत काय कार्यवाही केली याचा तपशील सात दिवसात द्यावा, असेही महापौरांनी ११ ऑक्टोबर रोजी दिलेल्या पत्रात नमूद केले होते. मात्र, त्याबाबतही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
बीआरटी मार्गामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्याबाबत आपण तातडीने धडक मोहीम हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच तातडीने वॉर्डन उपलब्ध करून द्यावेत आणि जे अधिकारी या परिस्थितीला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्रही शुक्रवारी महापौरांनी आयुक्तांना दिले आहे.