नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात त्रुटी असल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली असून, नगर रस्ता तसेच आळंदी रस्ता बीआरटी मार्गातील सर्व त्रुटी २८ फेब्रुवारीपर्यंत दूर केल्या जातील आणि नंतर मार्चमध्ये या मार्गावर बीआरटी सुरू केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बुधवारी सांगितले.
नगर रस्ता आणि आळंदी रस्त्यावरील बीआरटी सुरू करण्याची घाई सध्या केली जात असून, सर्व कामे पूर्ण झालेली नसतानाच या दोन्ही मार्गावर बीआरटी मार्ग सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, पीएमपी प्रवासी मंच आणि सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट या दोन स्वयंसेवी संस्थांनी या दोन्ही रस्त्यांवरील बीआरटी योजनेचे सुरक्षितताविषयक परीक्षण केल्यानंतर अनेक त्रुटी उघड झाल्या होत्या. हे दोन्ही मार्ग प्रवासी व वाहनचालकांसाठी धोकादायक असल्याचे उघड झाले आहे. या मार्गावर अनेक सुधारणा आवश्यक असल्याचेही पत्र या संस्थांनी दिले असून, परीक्षणाचा संपूर्ण अहवालही जाहीर करण्यात आला आहे.
या पाश्र्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त कृष्णा यांची भेट घेऊन महापालिका प्रशासनाच्या कार्यवाहीबद्दल विचारले असता ते म्हणाले, की बीआरटी मार्गात ज्या त्रुटी लक्षात आल्या आहेत, त्या त्रुटी दूर करण्याचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत केले जाईल व त्यानंतरच या मार्गावर बीआरटी सुरू केली जाईल. या मार्गात सध्या कामे सुरू आहेत, तर काही ठिकाणी काम करताना अडचणी येत आहेत. आयआयटीला सुरक्षिततेसंबंधीचा अहवाल देण्याचे काम दिले होते. त्यांच्याकडून प्रारूप अहवाल आला असून, अंतिम अहवाल आल्यानंतर त्यानुसार त्रुटी दूर केल्या जातील.
आणखी वेळ लागण्याची शक्यता
बीआरटी मार्गाच्या सेफ्टी ऑडिटचे काम आयआयटी, मुंबईला देण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर या मार्गात कोणती कामे करावी लागणार आहेत ते स्पष्ट होईल. त्या अहवालात मोठय़ा स्वरूपाच्या सुधारणा सुचवल्या गेल्या असतील, तर बीआरटी योजना सुरू व्हायला आणखी विलंब लागू शकतो.