|| चिन्मय पाटणकर
पुणे : शहराच्या पूर्वेकडे असलेल्या, मराठेशाहीपासूनची ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या वानवडी या प्रभाग क्रमांक २५ मध्ये नागरिकांना सततची वाहतूक कोंडी सहन करावी लागते आहे. सार्वजनिक वाहतूक वेगवान करण्यासाठी काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या बीआरटी प्रकल्पाचा बोजवारा उडाल्याने रस्त्यावरील बीआरटी नावापुरती राहिली असल्याचे चित्र आहे. फातिमानगर चौकात आता उड्डाण पुलाची आवश्यकता असून त्याकडे अद्याप लक्ष देण्यात आलेले नाही. प्रभागातील मूळ समस्या सोडविण्यासाठीची कार्यवाही नगरसेवकांकडून होत नसल्याचे दिसत आहे.
महापालिके च्या वानवडी या प्रभाग क्रमांक २५ मध्ये धनगराज घोगरे आणि कालिंदा पुंडे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आहेत. रत्नप्रभा जगताप आणि प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. वानवडी ही महापालिके ची जुनी हद्द होती. मात्र गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार आता वानवडीच्या पलीकडेही मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच सोलापूर रस्त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये वानवडी, फातिमानगर आणि लगतचा परिसर मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. अनेक नव्या इमारती, सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. वस्ती ते बंगले अशा सर्व आर्थिक उत्पन्न गटातील नागरिक या प्रभागात राहातात. त्यामुळे या भागात ज्या नियोजनपूर्वक कामे व्हायला हवी होती, तशी ती झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी नागरिकांना मूलभूत समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे.
मगरपट्टा, खराडी आयटी पार्कला जाणारे नोकरदार यांच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. बीआरटीसाठीचा रस्ता तसाच ठेवल्याने त्यातून खासगी वाहने जातात. काही वेळा अपघातही होतात. शहरातील अन्य प्रभागांप्रमाणेच या प्रभागातील बहुतेक भागांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा आहे. नव्या स्वच्छतागृहांची उभारणी झालेली नाही. पर्यायी रस्ते निर्माण झाले नाहीत. कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम के ल्यानंतर रस्ते पूर्ववत करताना त्यावर खड्डे राहतात. अंतर्गत भागातील रस्ते अरुंद आहेत. वाहनतळाचीही अडचण वानवडीमध्ये जाणवते. बऱ्याच ठिकाणी पार्किं गची आखणी नाही. तसेच पार्किं गलाही शिस्त नसल्याने वाहतुकीला अडथळा होतो. पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. प्रभागातील काही भागांमध्ये पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. तसेच पदपथांवर भाजीविक्रे ते, टपऱ्या आणि अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण के ल्यामुळे नीट चालताही येत नाही. कचरा ही या प्रभागातील मोठी समस्या आहे. एकीकडे स्वच्छ पुणे सुंदर पुणेचा नारा महापालिके कडून दिला जात असताना या प्रभागात जागोजागी कचरा साठलेला दिसतो. प्रभागात पावसाळी वाहिन्यांचे काम करताना ते नियोजनपूर्वक झालेले नाही. दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरानंतर भैरोबा नाल्याच्या लगतच्या भागात पावसाळ्यात भीतीच्या छायेखाली राहावे लागते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे
वानवडी गाव, शिंदे छत्री, गावठाण, फातिमानगर, बी. टी. कवडे रस्ता, केदारी नगर, आझादनगर, जगताप नगर, उत्तम नगर, सोपानबाग, एसआरपीएफ गट एक आणि गट दोन, प्लेझंट पार्क, सेंट लॉरेन्स कॉलनी, परमार पार्क, जांभूळकर मळा, शिवरकर रस्ता, साळुंके विहार रस्ता, महात्मा फुले वसाहत
राजकीय प्रतिनिधी म्हणतात
प्रभागातील पाण्याची समस्या आजही कायम आहे. रस्ते खराब आहेत. क्रीडा संकुलाचे उद्घाटन होऊनही नागरिकांना ते वापरता येत नाही. कचरा उचलला जात नसल्याने अस्वच्छता आहे. दवाखाना, स्मशानभूमी, नाल्याची कामे प्रलंबित आहेत. विद्यमान नगरसेवकांनी नवे प्रकल्प आणलेच नाहीत. मूलभूत सोयीसुविधाच नागरिकांना मिळत नाहीत. विकासकामांमध्ये असमतोल दिसतो. – अतुल वानवडीकर, मनसे
वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा आहे. रस्त्यांवर-पदपथांवर पथारीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. गेल्या वषीच्या पुरानंतर भैरोबा नाल्याच्या दुरुस्तीसंदर्भातील उपाययोजनांचे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. मिळालेल्या निधीचा वापर कुठे, कसा केला जातो यात तफावत आहे. जुनेच प्रकल्प प्रभागात सुरू आहेत. – साहिल केदारी, काँग्रेस</strong>
नागरिक म्हणतात
प्रभागात गेल्या चार वर्षांत विशेष अशी कामे झालेली नाहीत. जुनेच प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न के ला जात आहे. तसेच रस्त्यांचे डांबरीकरण, मैलापाणी वाहिन्या अशी तीच तीच कामे केली जातात. हा परिसर विकसित होत असताना नागरिकांच्या काय मागण्या आहेत, त्यांच्या अपेक्षा, गरजा काय आहेत याचा विचार केला जात नाही. – अमोल गायकवाड, वानवडी
वाहतूक कोंडी ही भागातील सर्वांत मोठी समस्या आहे. बंद पडलेल्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या दुरुस्तीकडे कोणी लक्ष देत नाही. रस्त्यावर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहेत. उन्हाळ्यात पाण्याचा काही वेळा दाब कमी होतो. एसआरपीएफसारखा काही भाग चांगल्या पद्धतीने विकसित झाला आहे. नगरसेवकांशी संपर्क साधता येतो, भेटही होते. – सुनील भोसले, जांभूळकर चौक
लोकप्रतिनिधी म्हणतात
रस्ते, दिवे, पाणी या मूलभूत मागण्या पूर्ण केल्या आहेत. प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण केले आहे. तसेच साळुंके रोड ते सोलापूर रोडपर्यंत नाल्याचे काम सुरू केले आहे. नाल्याचे पाणी गाळून सांडपाणी बंदिस्त स्वरूपात सोडले जाते. आझादनगरमध्ये पावसाळी वाहिनीचे काम केले. ई ग्रंथालयाचे काम ७५ टक्के झाले आहे. सरदार महादजी शिंदे यांची माहिती देणारी म्युरल आणि चित्रांचा प्रकल्प राबवला जाणार आहे. वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी उड्डाणपुलासाठी पाठपुरावा सुरू आहे. – धनराज घोगरे, नगरसेवक
शिवरकर दवाखान्यात डायलिसिस सेवा सुरू केली. दवाखान्याचे नूतनीकरण केले. शहरातील पहिले भूलभुलैय्या उद्यान विकसित केले. आझादनगरमधील नागरिकांसाठी आनंदवन येथे प्रवेशद्वार बांधले. पावसाळी वाहिनीचे काम के ले. शिंदे छत्री जवळील रस्ता आणि होले वस्ती येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. शिवरकर उद्यानात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र खुली व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. – कालिंदा पुंडे, नगरसेिवक
बास्केटबॉल कोर्टचे लोकार्पण झाले. जयसिंगराव ससाणे उद्यानाचे काम लवकरच पूर्णत्वाला जाईल. या उद्यानात उत्तम सुविधा आहेत. या उद्यानामुळे घोरपडी, सोलापूर रस्ता परिसरात राहणाऱ्या नागरिकांची होऊ शके ल. महापालिकेच्या निधीतून एसआरपी गट क्रमांक एकमध्ये क्वचितच कामे झाली होती. मात्र गेल्या चार वर्षांत या भागात रस्ते, पाणी, दिवे अशी सगळी नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. निधी तोकडाआहे. प्रभागासाठी नव्या प्रकल्पांच्या कल्पना असूनही निधी मिळू शकला नाही. – रत्नप्रभा जगताप, नगरसेविका
क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. महादजी शिंदे ई लर्निंग स्कूल उभारण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय नागरिकांच्या मागणीनुसार मैलापाणी वाहिनी, दिवाबत्ती, काँक्रिट, पाणी पुरवठा अशी नागरी सेवांची कामे सातत्याने केली जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी प्रकल्प पूर्ण करायला निधी दिला नाही. तुटपुंज्या निधीत कामे कशी पूर्ण करायची हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे निधीसाठी सत्ताधाऱ्यांशी सातत्याने संघर्ष करावा लागला आहे. निधी उपलब्धतेमध्ये सत्ताधारी नगरसेवकांना सहा कोटी आणि आम्हाला दोन कोटी इतका दुजाभाव आहे. – प्रशांत जगताप, नगरसेवक
तक्रारींचा पाढा
- पदपथांवर अतिक्रमणे
- रस्त्यांची दुरवस्था
- वाहतूक कोंडी नित्याची
- विस्कळीत पाणीपुरवठा
- अपुऱ्या पायाभूत सुविधा